भारतीय नवउद्यमींना (स्टार्टअप) मिळणाऱ्या निधीचा ओघ चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत आटला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नवउद्यमींना मिळणारा निधी ७९ टक्क्याने कमी झाला आहे. भारतीय नवउद्यमी कंपन्यांमध्ये मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल १८.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. यंदा याच कालावधीत ही गुंतवणूक ३.८ अब्ज डॉलरवर घसरली आहे. देशातील नवउद्यमींनी यंदा २९३ भांडवल मिळवण्याचे व्यवहार केले आहेत. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ही संख्या ७२७ होती, अशी माहिती व्हेंचर इंटेलिजन्सने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

यावर्षी जूनमध्ये नवउद्यमींच्या निधी उभारणीच्या ४४ फेऱ्या झाल्या आणि त्यातून ५४.६ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. मागील वर्षी याच महिन्यात १०८ फेऱ्यांमध्ये २.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. यंदा जूनमध्ये भांडवल उभारणी मागील वर्षीच्या तुलनेत ७६ टक्क्याने कमी झाली आहे. याचवेळी निधी उभारणीचे व्यवहारही ६० टक्क्याने कमी झाले आहेत. याचबरोबर यावर्षी मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये गुंतवणुकीत ४२ टक्के घट झाली आहे. मे महिन्यात निधी उभारणीचे ५३ व्यवहार होऊन ९४.८ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली होती.

हेही वाचाः पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल; अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मिळणार मोठा लाभ

नवउद्यमींबद्दल चिंतेचे वातावरणही कारणीभूत

मागील काळात काही नवउद्यमी कंपन्यांतील गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. भारत पे, ट्रेल, झिलिंगो, गोमेकॅनिक आणि मोजोकेअर या कंपन्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे चर्चेत आल्या होत्या. याचा परिणाम नवउद्यमी कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीवर होत आहे.

हेही वाचाः वित्तीय तुटीत घसरण; एप्रिल, मे महिन्यांत २.१० लाख कोटी रुपयांवर

Story img Loader