मुंबई: सेन्सेक्स-निफ्टीतील मोठ्या घसरणीचा महिना राहिलेला डिसेंबरमध्ये, गुंतवणूकदारांनी समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये मोठी गुंतवणूक सुरूच ठेवली असून, परिणामी या महिन्यांत या ४१,१५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रवाह इक्विटी फंडांनी अनुभवला, असे गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. भांडवली बाजाराचा कल प्रचंड नकारात्मक असूनही, इक्विटी फंडातील ओघ मासिक आधारावर १४ टक्क्यांनी वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांनी डिसेंबरमध्ये ४१,१५६ कोटी रुपयांचा नक्त प्रवाह पाहिला, जो नोव्हेंबरमध्ये आलेल्या ३५,९४३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत १४.४ टक्क्यांनी वाढला आहे. याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये इक्विटी योजनांमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वाधिक ओघ दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे समभागसंलग्न फंडांमध्ये सकारात्मक प्रवाहाचा हा सलग ४६ वा महिना असून, गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांच्या वाढत्या आकर्षणाला याने अधोरेखित केले आहे, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी)’ गुरुवारी मासिक आकडेवारी प्रसिद्ध करताना म्हटले आहे.

हेही वाचा >>>मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

म्युच्युअल फंडांच्या स्मॉल आणि मिडकॅप योजनांकडे गुंतवणूकदारांचे लक्षणीय आकर्षण असून, सरलेल्या डिसेंबर महिन्यांत त्यातील गुंतवणुकीने विक्रमी उच्चांक गाठला, असे ‘ॲम्फी’ने म्हटले आहे. नोव्हेंबर २०२४ मधील गुंतवणुकीच्या तुलनेत सरलेल्या डिसेंबर महिन्यात मिडकॅप फंड योजनांमधील गुंतवणूक ४ टक्क्यांनी वधारून ५,०९३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र त्या तुलनेत लार्जकॅप फंडामधील गुंतवणुकीमध्ये २१ टक्क्यांची घसरण झाली असून डिसेंबर महिन्यात त्यात २,०१० कोटींचा ओघ राहिला, जो आधीच्या महिन्यात २,५४७ कोटी होता. स्मॉलकॅप फंड योजनांमधील गुंतवणूक १३.५ टक्क्यांनी वधारून ४,६६७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नोव्हेंबर महिन्यात स्मॉलकॅप फंडांनी ४,१११ कोटी रुपयांची गुंतवणूक आकृष्ट केली होती.

सेक्टोरल/थीमॅटिक फंडांमध्ये सर्वाधिक आवक राहिली ती १०० टक्क्यांनी वाढून १५,३३१ कोटींवर पोहोचली आहे. तसेच डिसेंबरमध्ये ३३ नवीन खुल्या (ओपन-एंडेड) योजना बाजारात दाखल झाल्या, तर एक नवीन क्लोज-एंडेड फंड बाजारात दाखल झाला. या नवीन फंडांच्या माध्यमातून बाजारात १३,६४३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. तर गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड (गोल्ड ईटीएफ) फंडांमध्ये सलग सातव्या महिन्यात ६४० कोटी रुपयांचा मंदावलेला प्रवाह दिसून आला.

हेही वाचा >>>“…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!

मासिक ‘एसआयपी’ ओघ २६ हजार कोटींपल्याड

शिस्तशीर गुंतवणुकीचा लोकप्रिय मार्ग बनलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’मधील मासिक योगदान नोव्हेंबरमधील २५,३२० कोटी रुपयांवरून, सरलेल्या महिन्यात २६,४५९ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. ‘एसआयपी’ खात्यांमध्येही निरंतर वाढ सुरू असून ती आता १३.६३ लाख कोटींहून अधिक झाली आहेत. विक्रमी मासिक योगदानासह गुंतवणूकदारांमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीला वाढती पसंती मिळत असल्याचे यातून दर्शविले गेले आहे. ३१ डिसेंबर २०२४ अखेर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ६६.९३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील महिन्यातील ६८.०८ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमनाने अमेरिकेच्या व्यापार धोरणांत बदल होण्याची शक्यता आहे. परिणामी त्याचा जगभरातील भांडवली बाजारांवर परिणाम झाला असून व्यापारातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर विश्वास कायम राखल्याचे आकडेवारी सुचविते.- वेंकट चालसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲम्फी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflow of rs 41156 crore into equity funds in december investment in small midcap funds contributed significantly print eco news amy