लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी  
मुंबई: देशातील समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ घटला असून, एप्रिलमध्ये तो चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर नोंदवला गेला आहे. गुंतवणूकदारांचा स्मॉल अँड मिड-कॅप फंडांकडे ओढा कायम असला तरी त्यांनी लार्ज कॅप फंडांकडे पाठ फिरवल्याचे गुरुवारी जाहीर मासिक आकडेवारीने स्पष्ट केले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्युच्युअल फंडांची शिखर संघटना ‘ॲम्फी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणूक एप्रिलमध्ये १६.४ टक्क्यांची घटून १८,९१७ कोटी रुपयांवर सीमित राहिली आहे. ही गुंतवणुकीची डिसेंबर २०२३ नंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ याआधी मार्च महिन्यातही घटला होता. कैक समभागांसह, भांडवली बाजाराच्या एकंदरीत चढ्या मूल्यांकनाच्या चिंतेमुळे हे घडले असून, बाजार नियामक ‘सेबी’ने याबाबत दिलेला इशारा यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे.  

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 7 May 2024: सोन्याच्या भावाने बिघडले लोकांचे बजेट, किमती रॉकेट वेगाने वाढल्या, वाचा १० ग्रॅमचा दर

देशांतर्गत इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणुकीचा मासिक ओघ फेब्रुवारी २०२१ पासून एकत्रित ५.१६ लाख कोटींच्या आसपास आहे. हा ओघ ३२,३८२ कोटी रुपयांच्या समभागांतील थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा खूप अधिक आहे. म्युच्युअल फंडातील ओघामुळे गेल्या ३८ महिन्यांत निफ्टी ५० निर्देशांकात ५६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये पुन्हा स्मॉल कॅप फंडांकडे मोर्चा वळविला. यामुळे त्यात २,२०९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आधीच्या महिन्यांत म्हणजे मार्चमध्ये या फंडांतून ३० महिन्यांत प्रथमच गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण वाढले होते. याचवेळी मिड कॅप फंडांतील गुंतवणूकही मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ७६.१ टक्क्यांनी वाढून १,७९३ कोटी रुपयांवर पोहोचली. मात्र लार्ज कॅप फंडांच्या गुंतवणुकीत मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये ८३ टक्क्यांची घट होऊन ती ३५८ कोटी रुपयेच केवळ झाली आहे.

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राची सक्रियता १४ वर्षांच्या उच्चांकी; महिनागणिक किंचित मंदावूनही एप्रिलमध्ये ६०.८ गुणांवर

‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक एप्रिलमध्ये २० हजार कोटीवर

म्युच्युअल फंड उद्योगाने सरलेल्या एप्रिलमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून प्रथमच २०,००० कोटी रुपयांवर गुंतवणूक गोळा करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. गुंतवणूकदार त्यांच्या थोड्याथोडक्या बचतीची गुंतवणूक करण्यासाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी ‘एसआयपी’ला अधिकाधिक स्वीकृती देत असल्याचे दिसून येते, असे आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. बालासुब्रमणियन म्हणाले. त्यांच्या मते, म्युच्युअल फंड गुंतवणुकीद्वारे उद्दिष्टे साध्य करता येतात हे गुंतवणूकदारांना आता पुरते समजले आहे.

भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने स्मॉल आणि मिड कॅप फंडांवर नियंत्रण आणले आहे. या पावलामुळे या फंडांच्या चढलेल्या मूल्यांकनाबाबतच्या गुंतवणूकदारांच्या चिंता कमी झाल्या आणि त्या परिणामी त्यांनी अधिक गुंतवणूकही आकर्षित केली.  – वेंकट छालसानी, मुख्याधिकारी, ॲम्फी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflows into equity funds hit four month low in april print eco news amy