पीटीआय, नवी दिल्ली : देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ६,२१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ३.१ टक्के वाढ झाली आहे. इन्फोसिसची स्पर्धा टीसीएस, विप्रो, एचसीएस टेक्नॉलॉजीज यासह इतर कंपन्यांशी आहे. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसच्या महसुलात ६.७ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३८ हजार ९९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले की, “आम्ही दुसऱ्या तिमाहीत उच्चांकी ७.७ अब्ज डॉलर मूल्याचे करार केले. जगभरात अनेक ठिकाणी आणि सर्वच प्रकारच्या कामामध्ये हे करार करण्यात आले. आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना बदलत्या स्वरूपाच्या सेवा देत आहोत. ग्राहकांना स्थित्यंतराचे फायदे देण्यासोबत उत्पादकता वाढीसाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी आम्ही मदत करीत आहोत.”
आगामी महसुलीवाढ माफकच!
कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी महसुलातील वाढीचे सुधारित उद्दिष्ट जाहीर केले असून, ते अवघे १ ते २.५ टक्के इतके माफक आहे. या आधी हे उद्दिष्ट १ ते ३.५ टक्के होते. याचवेळी कंपनीने परिचालन नफ्याचे २० ते २२ टक्क्यांचे उद्दिष्ट कायम ठेवले आहे. भागधारकांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे कंपनीने ५ रुपये दर्शनी किंमत असलेल्या प्रत्येक समभागासाठी १८ रुपयांचा अंतरीम लाभांश जाहीर केला आहे.