Infosys Shares Narayan Murthy: इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नातवाला मोठी भेट दिली आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नावे असलेले कोट्यवधींचे शेअर्स हे त्यांच्या नातवाच्या नावे केले केले आहेत. त्यामुळे नारायण मूर्तींची त्यांच्या कंपनीत असलेली भागिदारी आता अवघी ०.३६ टक्के झाली आहे. इन्फोसिस कंपनीने ही माहिती दिली आहे. नारायण मूर्तींच्या या निर्णयामुळे चार महिन्यांचा चिमुकला २४० कोटींचा मालक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण मूर्ती यांचा मोठा निर्णय

इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी २४० कोटींचे शेअर्स त्यांच्या नातवाच्या नावे केले आहेत. एकाग्र रोहन मूर्ती असं त्यांच्या नातवाचं नाव आहे. एक्स्चेंज फाईल करताना ही माहिती इन्फोसिसने दिली आहे. त्यामुळे नारायण मूर्तींचा नातू अवघ्या चार महिन्यांचा असतानाच २४० कोटींचा मालक झाला आहे. आजोबा आणि नातू यांचं नातं हे जगातलं सर्वात निर्मळ आणि प्रेमळ नातं असतं. आपल्या मुलापेक्षा कांकणभर जास्त प्रेम आजोबा नातवावर करत असतात. नारायण मूर्तींनीही त्यांच्या या निर्णयातून हेच सिद्ध केलं आहे.

एकाग्र रोहन मूर्ती हा नारायण मूर्ती यांचा नातू आहे. त्याच्या नावावर जे शेअर्स करण्यात आले आहेत त्याचे बाजारमूल्य २४० कोटी रुपये आहे. त्यामुळे चार महिन्यांचा एकाग्र एक दोन नाही तर २४० कोटींचा मालक झाला आहे.

हे पण वाचा- याला म्हणतात साधेपणा! नारायण मूर्तींनी लेकीसह घेतला आईस्क्रीम खाण्याचा आनंद, फोटो व्हायरल

नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन नोव्हेंबर २०२३ मध्ये पालक झाले आणि नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती आजी-आजोबा झाले. १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी बंगळुरुमध्ये एकाग्रचा जन्म झाला. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीचं लग्न ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झालं असून त्यांना दोन मुली आहेत.

१९८१ मध्ये इन्फोसिसची सुरुवात

नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिस कंपनी सुरू केली. इन्फोसिस कंपनी मार्च १९९९ मध्ये नॅस्डॅक (Nasdaq) वर सूचीबद्ध झाली. अलीकडे, इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दरम्यान, त्यांनी नॅस्डॅक सूचीचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणून केले. ते म्हणाले होते की, जेव्हा मी त्या लखलखत्या दिव्यांसमोर बसलो तेव्हा मला खूप अभिमान वाटत होता. इन्फोसिस ही Nasdaq वर सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys founder narayan murthy gifts shares worth rs 240 crore to 4 month old grandson ekagrah scj