Infosys : भारतातील आघाडीची आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फोसिसने २४० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामागचं कारण म्हणजे या २४० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना अंतर्गत मूल्यांकन चाचणी परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती सांगितली जात आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान हे प्रशिक्षणार्थी कंपनीत सामील झाले होते. यानंतर या सर्व प्रशिक्षणार्थींची अंतर्गत मूल्यांकन चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत हे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊ न शकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खरं तर हे प्रशिक्षणार्थी नोकरीची वाट पाहत होते. मात्र, त्यांचं इन्फोसिसमध्ये नोकरी कराण्याचं स्वप्न भंगलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

१८ एप्रिल रोजी पाठवलेल्या कंपनीच्या ईमेलनुसार, इन्फोसिसने अंतर्गत मूल्यांकन चाचण्या उत्तीर्ण न झालेल्या २४० एंट्री-लेव्हल कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. तसेच याआधीही फेब्रुवारीमध्ये कंपनीने अशाच प्रकारे ३०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकलं होतं.

सिस्टीम इंजिनिअर्स आणि डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनिअर्स म्हणून नियुक्त केलेले प्रशिक्षणार्थी ‘जेनेरिक फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम’मध्ये अतिरिक्त तयारीसाठी वेळ, शंका निरसन चर्चा सत्रे, मॉक असेसमेंट्स आणि तीन चाचण्या घेऊन देखील हे प्रशिक्षणार्थी पात्रता निकष पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

इन्फोसिसने नोकरीवरून काढून टाकलेल्या प्रशिक्षणार्थींना कंपनी प्रायोजित बाह्य प्रशिक्षण कार्यक्रमांचा पर्याय दिला आहे. कंपनीकडून मोफत कौशल्य विकास कार्यक्रम, प्रवास भत्ता आणि इतर सपोर्ट पर्याय मिळण्याचं आश्वासन दिलं आहे.यामध्ये एका महिन्याचा पगार आणि प्रशिक्षण केंद्रात राहण्याची व्यवस्था आणि प्रवास भत्ता याचा समावेश आहे.

वृत्तानुसार,”तुम्ही इन्फोसिसच्या बाहेर संधी शोधत असताना आम्ही तुम्हाला व्यावसायिक आउटप्लेसमेंट सेवा प्रदान करू. या बरोबरच बीपीएममध्ये उपलब्ध असलेल्या संधींसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तसेच जर तुम्हाला तुमचे आयटीतील कौशल्य किंवा ज्ञान आणखी वाढवायचं असेल तर तुम्ही इन्फोसिस प्रायोजित आयटी फंडामेंटल्सवरील बाह्य प्रशिक्षणाचा पर्याय निवडू शकता”, असं प्रशिक्षणार्थींना पाठवलेल्या टर्मिनेशन ईमेलमध्ये म्हटलं आहे.