पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचा निव्वळ नफा सरलेल्या मार्च तिमाहीत १२ टक्क्यांनी घसरून ७,०३३ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने ७,९६९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.
मार्च तिमाहीतील महसूल वार्षिक आधारावर ७.९ टक्क्यांनी वाढून ४०,९२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे कंपनीने गुरुवारी प्रमुख बाजारमंचांना कळवले आहे. गेल्यावर्षी मार्च तिमाहीत कंपनीने ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. सरलेल्या आर्थिक वर्षाअखेर (२०२४-२५) कंपनीच्या नफ्यात १.८ टक्के वाढ होऊन तो २६,७१३ कोटी रुपये झाला आहे. तर महसुलात ६.६ टक्क्यांची वाढ होऊन तो १,६२,९०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासामुळे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आम्ही ग्राहक सेवा केंद्रित संस्था तयार केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीकडील रोखता ४.१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्लाऊड या क्षेत्रात कंपनीकडून गुंतवणूक केली जात असून बाजारातील स्थान अधिक मजबूत करण्यावर भर असेल, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले.
कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिसमभाग २२ रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अंतिम लाभांश देयकासाठी रेकॉर्ड तारीख ३० मे २०२५ निश्चित करण्यात आली असून भागधारकांना ३० जून २०२५ रोजी लाभांश प्राप्त होईल. आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस इन्फोसिसची कर्मचारी संख्या ३,२३,५७८ वर पोहोचली आहे.
विद्यमान वर्षात २५ टक्के घसरण
इन्फोसिसचे समभाग गुरुवारच्या सत्रात १.०७ टक्क्यांनी वधारून १,४२८.१० रुपयांवर बंद झाले. अमेरिकेने आयटी कंपन्यांवर लादलेल्या शुल्कामुळे आणि त्यानंतर ९० दिवसांच्या विरामामुळे आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे २०२५ मध्ये इन्फोसिसचे समभाग आतापर्यंत २५ टक्क्यांनी घसरले आहेत.