पीटीआय, नवी दिल्ली
देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोसिसने जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ६,३६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ७ टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीने ५,९४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. इन्फोसिसची स्पर्धा टीसीएस, विप्रो, एचसीएस टेक्नॉलॉजीज यासह इतर आयटी कंपन्यांशी आहे.
एप्रिल ते जून तिमाहीतील नफा त्याआधीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटला आहे. सरलेल्या मार्च २०२४ तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ७,९६९ कोटी रुपये होता. जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत इन्फोसिसच्या महसुलात ३.६ टक्क्यांनी वाढ होऊन, तो ३९,३१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
हेही वाचा >>>Video: “विशीतले भारतीय त्यांच्याच जगात जगतायत, बाहेर काय चाललंय काही माहिती नाही”, अशनीर ग्रोवर यांचं विधान चर्चेत!
विद्यमान वर्षात कंपनीची वाटचाल बघून १५,००० ते २०,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. नवीन आर्थिक वर्षात मोठे कार्यादेश आणि सौदे, सर्वोच्च रोखतेसह दमदार सुरुवात केली आहे. जगभरात अनेक ठिकाणी आणि सर्वच प्रकारच्या कामामध्ये हे करार करण्यात आले. आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना बदलत्या स्वरूपाच्या सेवा देत आहोत. कंपनीने जून तिमाहीत ४.१ अब्ज डॉलर मूल्याचे कार्यादेश मिळविले आहेत. हे आमच्या ग्राहकांचा आमच्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले
कर्मचारी संख्या घटली
जून २०२४ तिमाहीत इन्फोसिसची एकूण कर्मचारी संख्या सुमारे ६ टक्क्यांनी घसरून, ३,१५,३३२ पर्यंत खाली आली आहे, जी वर्षभरापूर्वी ३,३६,२९४ होती. तर मागील म्हणजेच मार्च तिमाहीतील ३,१७,२४० वरून ती सरलेल्या जून तिमाहीत आणखी घसरली. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वापराची पातळी (युटिलायझेशन लेव्हल) वार्षिक आधारावर ७८.९ टक्क्यांवरून ८३.९ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.