बेंगळुरू : देशाच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिसने सरलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस ११ टक्क्यांची नफ्यात वाढ साधल्याचे गुरुवारी जाहीर केले. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वधारलेल्या नफ्यामुळे, कंपनीने संपूर्ण वर्षाच्या महसुली कामगिरीबाबतही उत्साही संकेत दिले आहेत.
तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसने ४१,७६४ कोटी रुपयांच्या महसुलाच्या कमाईसह, कंपनीने ६,८०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच तिमाहीत ३८,८२१ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता, जो यंदा ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. तर निव्वळ नफा मागील वर्षातील ६,१०६ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ११.४ टक्के असा वाढला आहे.
हेही वाचा >>> रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?
महसुली वाढ कशामुळे?
संपूर्ण आर्थिक वर्षासाठी इन्फोसिसने महसुलातील वाढ ही आधी अंदाजलेल्या ३.७५ टक्के ते ४.५ टक्के पातळीपेक्षा अधिक म्हणजे ४.५ टक्के ते ५ टक्के राहील, असे आता सूचित केले आहे. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) या क्षेत्रातून कंपनीला एकतृतीयांश महसूल मिळत असतो. मुख्यत: अमेरिकेतील ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीमुळे या विभागाच्या महसुलांत सरलेल्या तिमाहीत ६.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तिमाहीत कंपनीने कार्यादेशांमध्ये नव्याने ३० दशलक्ष अमेरिकी डॉलरची भर घातली आहे.
समभागांत मूल्यतेजी
तिमाही निकालांच्या घोषणेपूर्वी, गुरुवारी भांडवली बाजारातील सत्रअखेर इन्फोसिसचा समभाग १,९२० रुपयांवर स्थिरावला आणि भावात दीड टक्क्यांची वाढ त्याने साधली. अपेक्षेपेक्षा सरस तिमाही कामगिरीचे शुक्रवारी समभागाच्या भावात सकारात्मक प्रतिबिंब उमटलेले दिसू शकेल.