मुंबई : देशात परदेशी चलनाचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परदेशी चलनांतील ठेवींवरील व्याजदर मर्यादा वाढवण्याची शुक्रवारी घोषणा केली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी हे पाऊल उचलले गेेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यवर्ती बँकेने शुक्रवारपासून, बँकांना आता १ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या परदेशस्थ भारतीयांच्या नवीन ठेवींवरील व्याजदर वाढवण्याची परवानगी दिली. ती वाढीव व्याजदर मर्यादा ‘ओव्हरनाइट अल्टरनेटिव्ह रेफरन्स रेट’ (एआरआर) अधिक ४०० आधारबिंदू अशी असेल. ती याआधी २५० आधारबिंदू एवढी मर्यादित होती. त्याचप्रमाणे, ३ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर एआरआर अधिक ५०० आधारबिंदू व्याज दिले जाऊ शकते. पूर्वी त्यासाठी ३५० आधारबिंदूची कमाल मर्यादा होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंतच या व्याजदर मर्यादेचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘सेमीकंडक्टर चिप’ आयात १.७१ लाख कोटींवर

रुपयात सावरण्यासाठी पाऊल

डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला असून विनिमय मूल्यातील अस्थिरता रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून डॉलरची विक्री सुरू आहे. परिणामी परकीय चलन गंगाजळीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तीव्र घसरण झाली आहे. मुख्यतः डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीच्या दबावामुळे रुपया १.३ टक्क्यांनी घसरला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interest rate on foreign currency deposits increased step to revive falling rupee print eco news zws