मुंबई: सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी गुरूवारी उच्चांकी पातळी गाठली आणि त्या परिणामी देशांतर्गत बाजारातही सोन्याची झळाळी वाढल्याचे दिसून आले. वायदे बाजार मंच एमसीएक्सवर सोन्याचा भाव तोळ्याला ६१,४९० रूपयांवर पोहोचला, तर मुंबईच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा घाऊक दर प्रति १० ग्रॅमसाठी ६१,६४५ रुपयांवर सुरू होते.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आगामी काळात व्याजदरात वाढ न करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर घसरून सोन्याच्या भावाने उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याने आज ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सोन्याचा भाव प्रतिऔंस २,०८१ डॉलरवर गेला. दरम्यान, एमसीएक्सवर गुरुवारी सकाळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४३२ रूपयांनी वाढून ६१,४९० रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव ८६८ रुपयांनी वाढून प्रति किलो ७७,४५० रुपयांवर पोहोचला. मुंबई सराफ बाजारात शुद्ध सोने तोळ्यामागे ८० रुपयांनी वाढून दिवसअखेरीस ६१,६४६ रुपयांवर स्थिरावले.
हेही वाचा >>>चंदा कोचर यांची बडतर्फी वैध; आयसीआयसीआय बँकेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाची मोहोर
याबाबत कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शहा म्हणाले की, देशांतर्गत पातळीवर सोन्याने आज उच्चांकी पातळीला स्पर्श केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा भावाने उच्चांकी पातळी गाठली. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील निर्णयावर लक्ष ठेऊन सोन्याच्या भावात तेजी सुरू होती. अमेरिकेतील आर्थिक विकासाची गती मंदावली असून, त्याचा प्रतिकूल परिणाम डॉलरवर होत आहे. सुरक्षित पर्याय म्हणून आगामी काळात सोने आणि चांदीकडे कल वाढणार आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २,०९० ते २,१०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. याचवेळी देशांतर्गत पातळीवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ६२,५०० ते ६२,७५० रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.