वसई : महागाईची चढती भाजणी, भांडवली बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बदलत्या काळानुसार गुंतवणुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. महागाई आणि गुंतवणुकीची सांगड घालणारे वित्तव्यवस्थापन आवश्यक असून गुंतवणुकीचे पुनरावलोकन करताना आपण केलेली किंवा करत असलेली गुंतवणूक काळानुरूप आहे का? त्याचा आढावा घेऊन त्यानुसार गुंतवणुकीत बदल केले आहेत का हे पडताळून बघणे आवश्यक आहे, असा कानमंत्र ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात बुधवारी देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दुपारी या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम विरार पालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडला. या वेळी वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे उपस्थित होते. महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये असणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी आपल्याला मिळत असलेल्या पैशातून जमेल तितकी गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे असे मार्गदर्शन बगाडे यांनी केले.

भांडवली बाजारात वादळी चढ-उतार, महागाईचा चढता पारा आणि परिणामी व्याजाचे वाढत चाललेले दर, अशा अस्वस्थ व अस्थिर वातावरणात सुयोग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग या निमित्ताने वक्त्यांकडून सांगण्यात आले. प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी यावरून त्याची आर्थिक क्षमता, जोखीम ठरत असते. या जोखमीचा विचार करून गुंतवणूक कशी बदलावी याविषयी अर्थअभ्यासक आणि गुंतवणूक नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अधिक व्याजाच्या मोहापायी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवून नुकसान करण्यापेक्षा गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या आपले पैसे दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे गुंतवावे, असा सल्ला जोशी यांनी दिला.

निवृत्तीपश्चात नियोजनाच्या मधुर फळांचा आस्वाद घेण्यासाठी दीर्घकाळात जोखीम-गुंतवणूक ताळमेळ राखत मार्गक्रमण गरजेचे आहे. नोकरीला लागल्यापासून, निवृत्त जीवनाविषयी नियोजनाच्या दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करणे आदर्शवत ठरेल, असे त्यांनी पगारदारांना उद्देशून सूचित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. कुणाल रेगे यांनी वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा आणि सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.

मान्यवरांची उपस्थिती

वसई विरार महापालिकेत बुधवारी पार पडलेल्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या गुंतवणूकदार जागराच्या कार्यक्रमाला महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पालिकेचे उपायुक्त दीपक कुरळेकर (आस्थपना), उपायुक्त नानासाहेब कामठे (परिहवन आणि विधी), उपायुक्त समीर भूमकर (कर), उपायुक्त तानाजी नरळे (पाणीपुरवठा), अजित मुठे (अतिक्रमण) किशोर गवस (निवडणूक) वाय एस रेड्डी (संचालक, नगररनचा), मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी, अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव, सर्व प्रभाग समिती आणि विभागांचे साहाय्यक आयुक्त, अभियंते उपस्थित होते.

गुंतवणूक करताना मालमत्ता विभाजन हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. महागाईवर मात करणाऱ्या परताव्यासाठी म्युच्युअल फंडासह वैविध्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सोन्यामध्येदेखील गुंतवणूक शक्य आहे. सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला अवघ्या पाचशे रुपयांपासून देखील म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला सुरुवात करणे शक्य आहे.  

स्वप्निल तांबे, समूह व्यवस्थापक (मुंबई विभाग), आयसीआयसीआय प्रु. म्युच्युअल फंड

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment advice for vvmc employees in loksatta arthsalla event zws