लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : गुंतवणूक नियोजन, करविषयक नियोजन आणि जीवनांत कमावलेल्या संपत्तीच्या वारसाहक्काचे नियोजनही तितकेच आवश्यक! आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या संपत्तीचे वाटे आणि हस्तांतरण कसे व्हावे याचा निर्णय हयातीतच घेण्यास मदतकारक ‘इच्छापत्र’ हा या दृष्टीने महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेतंर्गत याच अंगाने विशेष मार्गदर्शन सत्र शनिवारी सायंकाळी बोरिवलीत आयोजित करण्यात आले आहे.
संपत्ती व्यवस्थापनांत अत्यंत महत्त्वाचे, परंतु खूपच साध्या आणि सोप्या असलेल्या ‘इच्छापत्रा’च्या प्रक्रियेचे महत्त्व, ते कसे बनवावे आणि संलग्न प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता अर्थभान’च्या या विशेष सत्रात कायदेतज्ज्ञ आणि लेखक ऍड रोहित एरंडे हे या निमित्ताने देतील. गुंतवणूक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेल्या या कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला कॅपिटल मुच्युअल फंड’ मुख्य प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता, सेंट अँन्स हायस्कुल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (प.) येथे होत आहे.
हेही वाचा >>>टाटा समूह शेअर बाजारात ‘नंबर वन’; गाठला ३० लाख कोटींचा टप्पा
आर्थिक स्वयंनिर्भरता ही उत्पन्नातून खर्च वजा जाता गाठीशी राहणाऱ्या थोड्याथोडक्या का होईना, पण नियमित बचत आणि गुंतवणुकीतून शक्य आहे. याची उकल या कार्यक्रमात वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करतील. ‘गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन’ या विषयाद्वारे जीवनाच्या विविध टप्प्यांत अनुसरायचे गुंतवणुकीचे मार्ग ते सांगतील. उपस्थितांना या निमित्ताने तिन्ही वक्त्यांना त्यांचे प्रश्न व शंका थेट विचारता येतील.
वक्ते
कौस्तुभ जोशी गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन
ऍड रोहित एरंडे इच्छापत्र का व कसे?
कुठे : सेंट अँन्स हायस्कुल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (प.)
कधी : शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता