मुंबई : अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती, भू-राजकीय घटना आणि अमेरिकेतील निवडणूक निकालासंबंधाने अनिश्चितता यामुळे सरलेल्या नोव्हेंबरमध्ये इक्विटी अर्थात समभागसंलग्न म्युच्युअल फंडांमध्ये अवघा ३५,९४३ कोटी रुपयांचा ओघ दिसून आला, जो मासिक आधारावर १४ टक्क्यांनी ओसरला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीचे साधन म्हणून म्युच्युअल फंडाची लोकप्रियता कायम असून इक्विटी फंडामध्ये सलग ४५ व्या महिन्यात सकारात्मक निधी प्रवाह कायम आहे, अशी माहिती म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने मंगळवारी दिली.
देशांतर्गत भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरतेचे वातावरण आहे. विविध प्रतिकूल आर्थिक घटक, भू-राजकीय घडामोडी आणि अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीमुळे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी थांबा आणि वाट पाहण्याचा दृष्टिकोन अवलंबला आहे. यामुळेच सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात ‘एसआयपी’सह एकरकमी प्रवाहात घट झाली, असे मोतीलाल ओसवाल एएमसीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी म्हणाले.
हेही वाचा : ‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
म्युच्युअल फंड उद्योगाने आधीच्या ऑक्टोबर महिन्यात २.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अनुभवली. त्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात केवळ ६०,२९५ कोटी रुपयांचा ओघ दिसून आला. या घसरणीनंतरही म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ऑक्टोबरमधील ६७.२५ लाख कोटी रुपयांवरून नोव्हेंबरमध्ये वाढून ६८.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
समभागसंलग्न योजनांमध्ये ऑक्टोबरमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ३५,९४३ कोटी रुपयांचा ओघ राहिला. इक्विटी योजनांमध्ये, थीमॅटिक फंडाने ७,६५८ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रवाहासह गुंतवणूकदारांना आकर्षित केले. मात्र त्याआधीच्या ऑक्टोबरमध्ये त्यामध्ये १२,२७९ कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात १३,२५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. लार्ज-कॅप फंडांमधील ओघ ऑक्टोबरमधील ३,४५२ कोटी रुपयांवरून नोव्हेंबरमध्ये २,५४८ कोटी रुपयांवर घसरला.
हेही वाचा : उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
‘एसआयपी’चे योगदान किती?
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक जुलै २०२३ पासून दरमहा वाढत आली आहे. मात्र सरलेला नोव्हेंबर महिना या वाढीला अपवाद ठरला. या महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून २५,३२० कोटी रुपयांची गुंतवणूक आली. तर आधीच्या ऑक्टोबर महिन्यातील २५,३२२ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात २ कोटी रुपयांची घट झाली. जून २०२३ मध्येदेखील आधीच्या महिन्याच्या तुलनेत १४.२३ कोटी रुपयांची घट नोंदवल्यानंतर, पुढील १६ महिने ही वाढ स्थिरपणे सुरू होती.
स्मॉल-कॅप फंडाकडे ओढा
गुंतवणूकदार लार्ज-कॅप आणि हायब्रीड फंडांसारख्या कमी-जोखीम श्रेणींमधून स्मॉल-कॅप फंडांसारख्या उच्च-जोखीम पर्यायांकडे वळत आहेत. स्मॉल-कॅप फंडांमध्ये ऑक्टोबर महिन्यात ३,७७२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ती सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात ४,११२ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.