मुंबई: भू-राजकीय ताणतणाव आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजारात प्रति १० ग्रॅम ८५,००० रुपये आणि अगदी ९०,००० रुपयांपर्यंत नवीन वर्षात सोन्याची विक्रमी दौड सुरू राहण्याची शक्यता आहे. आगामी वर्षाबाबत विश्लेषकांचे हे महत्त्वाकांक्षी कयास असले, तरी सरलेल्या २०२४ मध्येच गुंतवणुकीवर सर्वोत्तम लाभ देणारी ही मालमत्ता ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोन्याने सर्वोत्तम कामगिरीसह २०२४ मध्ये देशांतर्गत बाजारात २३ टक्के असा अभूतपूर्व परतावा दिला. या वर्षी ३० ऑक्टोबरला मौल्यवान धातूने ८२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला. चांदीने ३० टक्क्यांच्या परताव्यासह या उत्कृष्ट कामगिरीला साथ देत, प्रतिकिलो १ लाख रुपयांची पातळीही ओलांडली आहे.

हेही वाचा : New Rule In 2025 : यूपीआय पेमेंट ते EPFO… एक जानेवारीपासून ‘या’ नियमांत होणार बदल

जगभरात मध्यवर्ती बँकांद्वारे पतविषयक धोरणांत नरमाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या दाटलेल्या मळभात त्यांच्याकडून झालेली लक्षणीय खरेदी हे सोन्याच्या विक्रमी तेजीस मुख्य कारण ठरले. मात्र भू-राजकीय संकट निवळले आणि रुपयाच्या घसरणीने वेग पकडल्यास मौल्यवान धातू कमकुवत होण्याचेही कयास आहेत. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या (एमसीएक्स) हाजिर बाजारात (स्पॉट मार्केट) सोन्याचा भाव ७९,३५० रुपये प्रति १० ग्रॅम असून, वायदे व्यवहारांत तो ७६,६०० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.

हेही वाचा : Bank Holidays In January 2025 : जानेवारीत १५ दिवस बँका राहतील बंद; १ तारखेलाही सुट्टी आहे का? वाचा, सुट्यांची संपूर्ण यादी

आगामी २०२५ ही सकारात्मकच!

सराफ उद्योगासाठी २०२४ हे सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले. प्रामुख्याने सणासुदीच्या आणि लग्नसराईशी संबंधित मागणीने दागिन्यांचा वापर १७ टक्क्यांनी वाढला. आगामी २०२५ चा कल हा होऊ घातलेले तब्बल ४० लाख विवाहसोहळे पाहता देशातील दागिन्यांचा वापर वाढेल. भारतात सोन्याकडे केवळ साजश्रृंगारासाठी नव्हे, तर गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते आणि या दुहेरी भूमिकेमुळे तरुण पिढीला सोन्याकडे जास्त आकर्षण निर्माण झाले आहे.

राजेश रोकडे, उपाध्यक्ष, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment in gold given 23 percent returns highest in the market in 2024 print eco news css