मुंबई: भांडवली बाजारातील घसरणीचा नकारात्मक परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर देखील दिसत असून, सरलेल्या फेब्रुवारीमध्ये समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक २६ टक्क्यांनी घसरून २९,३०३ कोटी रुपयांवर मर्यादित राहिली, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ॲम्फीने बुधवारी दिली.
भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीमध्ये घट होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे इक्विटी फंडांच्या स्मॉल आणि मिडकॅप योजनांतील ओघ लक्षणीय घटला आहे. मात्र इक्विटीतील ओघ महिनागणिक ओसरला असला तरी नक्त प्रवाह सकारात्मक राहण्याचा हा सलग ४७ वा महिना आहे.
‘ॲम्फी’ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये समभागसंलग्न म्युच्युअल फंडांमध्ये २९,३०३ कोटी रुपयांचा निधी ओतला आहे, जो जानेवारीमध्ये नोंदवलेल्या ३९,६८८ कोटी रुपयांपेक्षा आणि डिसेंबरमधील ४१,१५६ कोटी रुपयांच्या तुलनेत खूपच कमी आहे. फेब्रुवारीमध्ये स्मॉल व मिडकॅप फंडांतील ओघ कमी झाल्यामुळे ही मोठी घसरण झाली.
फेब्रुवारीत या फंडांमध्ये अनुक्रमे ३,४०६ कोटी आणि ३,७२२ कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली, जी जानेवारीमध्ये अनुक्रमे ५,१४७ कोटी आणि ५,७२० कोटी रुपये नोंदवली गेली होती. तरी ती लार्ज-कॅप फंडांमध्ये झालेल्या २,८६६ कोटी रुपयांच्या नक्त गुंतवणुकीपेक्षा जास्तच आहे. जानेवारीमध्ये लार्जकॅप फंडात ३,०६३ कोटी रुपये आले होते.
इक्विटी श्रेणींमध्ये, सेक्टोरल/थीमॅटिक फंडांमध्ये सर्वाधिक ५,७११ कोटी रुपयांचा निव्वळ ओघ आला, त्यापाठोपाठ फ्लेक्सी कॅप फंडामध्ये ५,१०४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. इक्विटी व्यतिरिक्त, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये (गोल्ड ईटीएफ) जानेवारीमध्ये ३,७५१ कोटी रुपयांच्या तुलनेत १,९८० कोटी रुपयांचा निधी आला. तथापि, जानेवारीमध्ये १.२८ लाख कोटी रुपयांचा निधी आल्यानंतर फेब्रुवारीत डेट फंड अर्थात रोखेसंलग्न फंडातून ६,५२५ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला.
एकूण ‘एयूएम’मध्येही घसरण
फेब्रुवारीअखेर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) ६४.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील महिन्यात ६७.२५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत घसरली आहे. फेब्रुवारीमध्ये ‘एयूएम’मध्ये २.७२ लाख कोटींची घसरण झाली आहे.