लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेच्या सहकार्याने, त्याच समूहातील एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘जननिवेश एसआयपी’ सुरू केली आहे. यामध्ये केवळ २५० रुपये इतक्या अल्प रकमेपासून सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’चा पर्याय खुला करण्यात आला आहे. ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक आणि मासिक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ग्रामीण, निमशहरी विभाग आणि छोट्या शहरातील बचतकर्त्यांना आणि पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्याच्या उद्दिष्टाने हे पाऊल उचलले गेले आहे.
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि स्टेट बँकेचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांच्या उपस्थितीत ‘जननिवेश एसआयपी’चे अनावरण करण्यात आले. ‘एसआयपी’च्या माध्यमातून मासिक २५० रुपये गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना ३० वर्षांच्या कालावधीत १५ टक्के परतावा दर गृहीत धरल्यास १७.३० लाख रुपयांची संपत्ती मिळवून देण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा कालावधी ४५ वर्षांपर्यंत वाढवल्यास ही संपत्ती १.६३ कोटी रुपयांवर जाऊ शकेल.
गुंतवणुकीतील अडथळ्यांना दूर करून, ‘जननिवेश एसआयपी’ योजनेने लाखो नवीन ग्राहकांना म्युच्युअल फंडाच्या आर्थिक जगतात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केवळ आर्थिक समावेशनाला चालनाच नाही तर गुंतवणूकदारांमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयींनासुद्धा प्रोत्साहन देणे असे यामागे उद्दिष्ट असल्याचे एसबीआय म्युच्युअल फंडाचे सह-व्यवस्थापकीय संचालक डी. पी. सिंग म्हणाले. ही सुविधा ‘एसबीआय योनो’ मंच आणि पेटीएम, ग्रो आणि झीरोदा या सारख्या अन्य व्यासपीठांवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना परिचित डिजिटल साधनाद्वारे सहज गुंतवणुक करता येणार असून त्याचे व्यवस्थापनसुध्दा त्यांनाच करता येणार आहे.