पीटीआय, नवी दिल्ली : देशातील कृषी क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांतील गुंतवणुकीचा ओघ आटू लागला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये या कंपन्यांतील गुंतवणूक ४५ टक्क्यांनी घटली आहे. जागतिक पातळीवर व्याजदरात झालेली वाढ आणि वाढत्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा ही दोन प्रमुख कारणे यामागे आहेत.
‘एफएसजी’ या सल्लागार संस्थेने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, जागतिक पातळीवर कृषी नवउद्यमींमध्ये होणारी गुंतवणूक मागील आर्थिक वर्षात १० टक्क्यांनी घटली आहे. चालू आर्थिक वर्षातही या कंपन्यांतील गुंतवणुकीत घट होण्याची चिन्हे आहेत. पुढील आर्थिक वर्षात मात्र या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आर्थिक वर्षात कृषी नवउद्यमी कंपन्या नफ्यावर भर देताना दिसतील.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय बाजारात साखर महागली, दर १२ वर्षांच्या उच्चांकावर
याबाबत एफएसजी आशिया विभागप्रमुख ऋषी अगरवाल म्हणाले की, जागतिक पातळीवर मंदीचे वारे आहे. त्याचा परिणाम भारतातील कृषी क्षेत्रातील नवउद्यमी कंपन्यांवर झाला आहे. या कंपन्यांनी गुंतवणुकीचा ओघ कमी झालेल्या काळात व्यवसाय पद्धतींमध्ये बदल करावा आणि नफा कमावण्याच्या दिशेने पावले टाकावीत. भारतीय कृषी नवउद्यमी कंपन्यांमध्ये साहसी भांडवल (व्हेंचर कॅपिटल) गुंतवणूकदारांकडून २०२१-२२ या आर्थिक वर्षात मोठी गुंतवणूक झाली होती. नंतर २०२२-२३ मध्ये ही गुंतवणूक कमी झाली.
हेही वाचा : केंद्राकडून मिनीरत्न कंपनी ‘वापकॉस’ची हिस्सा विक्री रद्द
करार वाढले पण गुंतवणूक कमी
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कृषी नवउद्यमी कंपन्यांमध्ये १२१ गुंतवणूक करार झाले. नंतर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यात वाढ होऊन ते १४० वर पोहोचले. याचवेळी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १२७ कोटी डॉलर गुंतवणूक झाली आणि २०२२-२३ मध्ये त्यात घट होऊन ती ७० कोटी डॉलरवर आली.