पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेत आतापर्यंत १६३ भारतीय कंपन्यांनी ४० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे तिथे सुमारे ४,२५,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असे ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’ शीर्षकाखाली गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आले आहे.
भारतीय कंपन्यांनी अमेरिकेमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर फंड) माध्यमातून सुमारे १८.५ कोटी डॉलर खर्च केले आहेत. तर संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलरचा वित्तपुरवठा केला आहे, असे भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत एरिक गार्सेट्टी यांच्या उपस्थितीत सांगितले.
अमेरिकेतील भारतीय कंपन्या अमेरिकेत सामर्थ्य, लवचीकता आणि स्पर्धात्मकता आणतात. शिवाय ते केवळ रोजगारच निर्माण करत नसून तेथील स्थानिक समुदायांना सामावून घेतात, असे संधू यांनी सांगितले. या वेळी भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जीदेखील उपस्थित होते. भारतीय कंपन्यांची वाढती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती, तसेच वाढत्या क्षेत्रातील वैविध्य आणि संपूर्ण अमेरिकेतील भौगोलिक उपस्थिती वाढविण्याची कटिबद्धता त्यांनी दर्शविली आहे, असे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक बॅनर्जी म्हणाले.
भारतीय कंपन्यांनी टेक्सासमध्ये सर्वाधिक ९.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे तिथे सर्वाधिक म्हणजेच २०,९०६ नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्यापाठोपाठ जॉर्जिया ७.५ अब्ज डॉलर (१३,९४५ नोकऱ्या), न्यू जर्सी ४.२ अब्ज डॉलर (१७,७१३ नोकऱ्या), न्यूयॉर्क २.१ अब्ज डॉलर (१९,१६२ नोकऱ्या), मॅसॅच्युसेट्स १.४ अब्ज डॉलर, केंटकी ९०.८ कोटी डॉलर, कॅलिफोर्निया ७७.६ कोटी डॉलर (१४,३३४ नोकऱ्या), मेरीलँड ७२ कोटी डॉलर, फ्लोरिडा ७१.१ कोटी डॉलर (१४,४१८ नोकऱ्या) आणि इंडियानामध्ये ५८.२ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.
सर्वेक्षणानुसार, ८५ टक्के भारतीय कंपन्यांनी पुढील काही वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची, तर ८३ टक्के कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत अमेरिकेत अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखली आहे.