आदित्य बिर्ला सन लाइफकडून ‘मल्टी ॲसेट अलोकेशन फंड’
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने समभाग (इक्विटी), रोखे (डेट) आणि वस्तू (कमोडिटी) यामध्ये गुंतवणूक असणाऱ्या ‘आदित्य बिर्ला सन लाइफ मल्टी ॲसेट अलोकेशन फंड’ या योजनेची नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) घोषित केली आहे. बुधवार, ११ जानेवारीपासून गुंतवणुकीस खुल्या झालेल्या या योजनेत २५ जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदारांना किमान ५,००० रुपये आणि त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.
जोखीम आणि लाभ यांचा समतोल राखण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीतून वैविध्य प्रदान करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, फंडाचा पोर्टफोलिओतील समभाग गुंतवणूक ही लार्ज कॅप समभागाकडे झुकलेली, फ्लेक्सी कॅप दृष्टिकोनातून लवचीकतेचा अवलंब करेल आणि सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये/थीममध्ये गुंतवणूक केली जाईल. तर निश्चित उत्पन्न विभागातून मोठ्या प्रमाणात संचयी धोरणाचा अवलंब करून पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान केली जाईल.
फंड घराण्याचे उद्दिष्ट समभाग गुंतवणुकीसाठी ६५ ते ८० टक्के, निश्चित उत्पन्न गुंतवणुकीसाठी १० ते २५ टक्के आणि कमोडिटीसाठी १०-२५ टक्के या प्रमाणात मालमत्ता वाटप राखण्याचे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात स्वतंत्र गुंतवणुका राखून त्या सांभाळण्याचे आणि त्यांचा निरंतर आढावा घेत राहण्याच्या चिंतापासून मोकळीक देणारी ही नवख्या आणि सरावलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य योजना असल्याचे आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन यांनी सांगितले. योजनेच्या समभाग गुंतवणुकीसाठी धवल शाह आणि भूपेश बामेटा, कमोडिटीजसाठी सचिन वानखेडे आणि परदेशातील गुंतवणुकीसाठी धवल जोशी हे निधी व्यवस्थापक असतील.
एचएसबीसी म्युच्युअल फंडाचा नवीन मल्टी कॅप फंड
एचएसबीसी म्युच्युअल फंडाने नवीन फंड प्रस्तुतीद्वारे (एनएफओ) ‘एचएसबीसी मल्टी कॅप फंड’ १० जानेवारीपासून गुंतवणुकीस खुला केला असून, येत्या २४ जानेवारी २०२३ पर्यंत तो गुंतवणुकीस खुला राहील. एचएसबीसी ॲसेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने, एल अँड टी एएमसी आणि एल अँड टी म्युच्युअल फंडाच्या योजनांच्या संपादनानंतर या फंड घराण्याचा हा पहिलाच एनएफओ आहे.
एचएसबीसी मल्टी कॅप फंड हा एक गुंतवणुकीस कायम खुला (ओपन-एंडेड) समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंड असून, बाजार भांडवलानुसार लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप प्रत्येकमध्ये किमान २५ टक्के गुंतवणूक करून दीर्घावधीत संपत्ती निर्माणाचे त्याचे उद्दिष्ट आहे. या फंडातून उर्वरित २५ टक्के गुंतवणुकीसाठी समभाग निवडण्याची लवचीकता निधी व्यवस्थापकाला आहे. एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे समभाग गुंतवणूक प्रमुख वेणुगोपाल मंगत हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाची रणनीती शाश्वत नफा, उच्च उत्सर्जन क्षमता आणि वाजवी मूल्यमापन असलेल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून ‘बॉटम अप स्टॉक पिकिंग’ पद्धतीने कंपन्यांची निवड करण्याची आहे.
डीएसपी इन्व्हेस्टमेंट्स मॅनेजर्सचा नवीन ‘जी-सेक इंडेक्स’ फंड
डीएसपी इन्व्हेस्टमेंट्स मॅनेजर्सने ‘डीएसपी क्रिसिल एसडीएल प्लस जी-सेक एप्रिल २०२३ फिफ्टी: फिफ्टी इंडेक्स’ फंड हा गुंतवणुकीस कायम खुला ‘टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स’ फंड बाजारात दाखल केला आहे. १० जानेवारीपासून खुल्या झालेल्या या फंडात येत्या १९ जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
हा फंड २५ एप्रिल २०३३ रोजी आणि त्या आसपास मुदतपूर्ती असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारांकडून जारी रोख्यांमध्येच केवळ गुंतवणूक करणार असल्यामुळे जोखमीबाबत सजग असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उच्च रोखता असलेले सरकारी रोखे (जी-सेक) आणि उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या राज्यांकडून जारी झालेल्या राज्य विकास कर्जरोख्यांमध्ये (एसडीएल्स) ५० : ५० टक्के प्रमाणात या फंडातून गुंतवणूक केली जाणार आहे. ‘एसडीएल’च्या निवडीसाठी फंडाकडून दुहेरी चाळणी लावली जाते. प्रत्येक राज्याचे त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत एकूण दायित्वाच्या प्रमाणानुसार आघाडीच्या ५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्वोत्तम दर्जा गुणांकावर आधारित ही चाळणी केली जाईल.