मुंबई : खाद्यतेलासह विविध ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात वेगाने विकास पावत असलेली ‘अदानी विल्मर लिमिटेड’ आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून २० टक्के हिस्सा विक्री करणार आहे. आंशिक समभाग विक्री १० जानेवारीपासून खुली होती असून गुंतवणूकदारांना १३ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
अदानी विल्मरच्या प्रवर्तक संस्थांपैकी एक असलेल्या अदानी कमोडिटीज ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीतील २० टक्के हिस्सा विकणार आहे, ज्यासाठी २७५ रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात अदानी विल्मरचा समभाग ३२४ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला, त्या तुलनेत प्रतिसमभाग ४९ रुपयांच्या सवलतीने हे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>Spotify : “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, ‘Work From Anywhere’ वर स्पॉटिफाय ठाम
अदानी विल्मर ग्रीन शू ऑप्शनसह १३.५० टक्के म्हणजेच सुमारे १७.५४ कोटी समभाग विकणार आहे. तर ‘ओएफएस’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यास अतिरिक्त ८.४५ कोटी समभागांची विक्री करण्यात येईल. ‘ओएफएस’मधील किमान २५ टक्के समभाग हे म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १३ जानेवारी रोजी बोली लावता येणार आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारां व्यतिरिक्त इतर श्रेणीतील गुंतवणूकदार कोणत्याही दिवशी बोली लावू शकतील.
हेही वाचा >>>मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
अदानी समूहाकडून विक्री
किमान सार्वजनिक हिस्सेदारी नियमाची पूर्तता करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने अदानी विल्मर या संयुक्त प्रकल्पातील १३ टक्के हिस्सेदारीची ३० डिसेंबर २०२४ रोजी विक्री केली. उर्वरित ३१ टक्के हिसेदारी सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलला विकणार आहे. अदानी विल्मरमधून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस पूर्ण ४४ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. विल्मर इंटरनॅशनल ही अदानी विल्मरमधील अदानी एंटरप्रायझेसचा ३१ टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. या व्यवहारातून २ अब्ज डॉलरहून अधिक निधी उभा राहणार आहे.