मुंबई : कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या गेल्या काही महिन्यांमध्ये अचानक प्रकाशझोत आल्या. त्यांच्या किमतीत ३० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र गेल्या तीन सत्रात गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नफावसुली केल्याने त्यांचे बाजारभांडवल ३.७९ लाख कोटींनी सरले. उपलब्ध आकडेवारीनुसार, संस्थात्मक गुंतवणूकदारांचे सुमारे ९३,५९० कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचे बाजारभांडवल सुमारे ४५,३०० कोटी रुपयांनी घसरले; आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या (एक लाखांपर्यंत आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या) संपत्तीमध्ये गेल्या तीन सत्रांमध्ये सुमारे ३६,४४० कोटी रुपयांची घट झाली.
हेही वाचा >>> टाटा मोटर्सकडून ‘ईव्ही’च्या किमतीत कपात
विद्यमान महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (पीएसयू) लोकांच्या वाढत्या विश्वासाचे कौतुक केले. राष्ट्रपतींच्या भाषणाच्या आभाराच्या प्रस्तावासाठी राज्यसभेच्या भाषणात, पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासून भारतातील सरकारी कंपन्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये ७८ टक्के वाढ झाल्याचे आणि वर्ष २०१४ मधील बाजारभांडवल ९.५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आता १७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असल्याचे सांगितले. तसेच २०१४ पासून सरकारी कंपन्यांची संख्या २३४ वरून २५४ पर्यंत वाढली असल्याचे सांगितले.
‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७० हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. एकूण बाजार भांडवलात सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा सुमारे १३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात, वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील भागविक्रीतून ५०,०० कोटी रुपये उभारण्याचे सरकारचे लक्ष्य जाहीर केले.
हेही वाचा >>> ‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा
रेल्वे कंपन्यांचे समभाग घसरले
रेल्वे कंपन्यांच्या समभागात त्यांच्या उच्चांकी पातळीपासून ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बाजारातील विश्लेषकांच्या मते, रेल्वे कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी नफावसुली एक कारण असू शकते कारण गेल्या आठवड्यापर्यंत समभाग तेजीत होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. दुसरे कारण सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेनुरूप नसल्याने देखील कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. शिवाय समभागांचे वाढीव मूल्यांकन ही चिंतेची बाब आहे, जेथे कंपन्यांच्या कमाईच्या तुलनेत समभागांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे समभाग गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा खूपच महाग झाले आहेत, असे मत एसबीआय सिक्युरिटीजचे मूलभूत अभ्यास (फंडामेंटल) विभागाचे प्रमुख सनी अग्रवाल म्हणाले.