नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांमुळे समभागांतील तीव्र पडझडीने अडचणीत आलेल्या अदानी समूहावर, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मात्र विश्वास दाखवत या काळात प्रत्यक्षात गुंतवणूक वाढवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी समूहातील अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅससह पाच कंपन्यांमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांची हिस्सेदारी वर्षभराच्या काळात वाढली आहे. मुंबई शेअर बाजाराकडून प्राप्त आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, सरलेल्या तिमाहीत अदानी विल्मर आणि अंबुजा आणि एसीसी या सिमेंट कंपन्यांसह, समूहातील इतर कंपन्यांमधील देशी गुंतवणूकदारांच्या हिस्सेदारीत वाढ झाली आहे. यावरून अदानी समूहावरील देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचा >>> क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे? त्याआधी आरबीआयचे गव्हर्नर काय म्हणताय ते जाणून घ्या

उल्लेखनीय म्हणजे, म्युच्युअल फंडांनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड वगळता समूहातील इतर सर्व कंपन्यांमधील हिस्सेदारीत वाढ किंवा ती कायम राखली आहे. समूहातील देशांतर्गत भागधारकांची एकूण हिस्सेदारी ५ टक्क्यांनी वाढून त्यांची संख्या ६८.८२ लाखांवर पोहोचली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा समूहातील कंपन्यांत भागभांडवल ठेवण्याबाबत संमिश्र कल दिसून आला.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अदानी ग्रीनमधील हिस्सेदारी मागील तिमाहीतील १.३६ टक्क्यांवरून डिसेंबर तिमाहीत १.६७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अदानी टोटल गॅसमधील हिस्सेदारी सप्टेंबरच्या तिमाहीत ६.०२ टक्क्यांवरून ६.२६ टक्क्यांपर्यंत वाढली, असे आकडेवारी दर्शविते. तसेच, अदानी विल्मरमधील त्यांचा हिस्सा मागील तिमाहीत ०.०१ टक्क्यांवरून ०.४१ टक्क्यांवर, अंबुजामधील ९.०७ टक्क्यांवरून ९.१९ टक्क्यांवर आणि एसीसीमधील हिस्सेदारी १०.२७ टक्क्यांवरून १०.७२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

हेही वाचा >>> सरकारच्या ‘या’ कंपनीने स्टेट बँकेला टाकले मागे 

दुसरीकडे, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी अदानी एंटरप्रायझेसमधील त्यांची हिस्सेदारी सप्टेंबर तिमाहीत ४.२६ टक्क्यांवरून ३.९५ टक्क्यांपर्यंत कमी केली. अदानी पोर्ट्समधील हिस्सेदारी ९.७२ टक्क्यांवरून ८.३७ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. तर, डिसेंबर तिमाहीत अदानी पॉवर आणि अदानी एनर्जी सोल्युशन्समधील हिस्सेदारी अपरिवर्तित ठेवली आहे.

एकट्या डिसेंबरमध्ये, अदानी समूहाच्या १० कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे ३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे आणि डिसेंबरअखेर समूहाचे बाजारभांडवल १४.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाचा अदानी समूहाबाबत निर्णय आल्यानंतर, ३ जानेवारी रोजी बाजार भांडवलाने १५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investors rush to buy share in five companies of adani group print eco news zws