मुंबई: देशाच्या इतिहासातील २७,८७० कोटी रुपयांची आजवरची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री असणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या ‘आयपीओ’कडे छोट्या गुतंवणूकदारांनी पाठ फिरवली असून, १५ ऑक्टोबरपासून सुरू होऊन, गुरुवारी संपुष्टात आलेल्या या भागविक्रीत वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शाच जेमतेम ५० टक्केच मागणी नोंदवणारे अर्ज येऊ शकले.

राष्ट्रीय शेअर बाजाराकडून प्राप्त तपशिलानुसार, १७ ऑक्टोबर म्हणजेच ‘आयपीओ’च्या अखेरच्या दिवशी ह्युंदाई मोटर इंडियाच्या समभागांसाठी एकंदर दुप्पट भरणा झाला. मात्र पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रतिसाद सोडता वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भरणा पूर्ण होऊ शकला नाही. या श्रेणीसाठी राखीव असलेल्या समभागांपैकी अनुक्रमे केवळ ५० आणि ६० टक्केच भरणा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>अदानी ग्रीनकडून १.२ अब्ज डॉलरची रोखे विक्री लांबणीवर

अखेरच्या दिवशी पाच वाजेपर्यंच्या प्राप्त आकडेवारीनुसार, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखीव हिश्शात ६.९७ पट अधिक भरणा झाला आहे. या श्रेणीसाठी ५,५४४ कोटी रुपये मूल्याचे समभाग राखीव ठेवण्यात आले होते. मात्र त्याबदल्यात ३८,६६१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची मागणी नोंदवण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्शासाठी १.७४ पट अधिक भरणा झाला. त्यांना प्रति समभाग १८६ रुपयांची सवलत कंपनीकडून देण्यात आली होती. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ९.९७ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले होते. या ‘आयपीओ’साठी सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून २१.४९ लाख अर्ज दाखल झाले आहेत.

बाजार पदार्पण कसे होणार?

आयपीओसाठी बोली लावण्याच्या अखेरच्या दिवशी ग्रे मार्केटमधील समभागाची किंमत १ टक्क्यांनी घसरली आहे. बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, समभाग आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या किमतीपेक्षा १४ रुपये खाली सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने आयपीओसाठी १८९५ रुपये ते १९६० रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. वर्ष २००३ मध्ये जपानी कंपनी मारुती सुझुकीने बाजारात पदार्पण केल्यानंतर, दोन दशकांहून अधिक काळानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी प्रवासी वाहन निर्मिती क्षेत्रातील ही दुसरी कंपनी आहे. २००३ प्रति समभाग १२५ रुपयाला आयपीओद्वारे मिळविलेला मारुती समभाग आता १२,३६७ रुपये (१६ ऑक्टोबर), म्हणजेच २१ वर्षात ९९ पटीने वाढला आहे.