मुंबई : जागतिक पातळीवर भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण असताना, येत्या आठवड्यात सहा कंपन्या बाजारातून ‘प्रारंभिक समभाग विक्री – आयपीओ’च्या माध्यमातून एकत्रित ७,३०० कोटींचा निधी उभारणार आहेत. चालू आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीज आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा), गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस, फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज आणि रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी या कंपन्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांची पसंती अजमावणार आहेत. या सहापैकी टाटा टेक्नॉलॉजीज आणि इरेडा या कंपन्या मोठी निधी उभारणी करणार आहेत.
इरेडा
केंद्र सरकारच्या मालकीच्या इरेडाची प्रारंभिक समभाग विक्री २१ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून गुंतवणूकदारांना २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. २,१५० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित असलेल्या भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ३० रुपये ते ३२ रुपये किंमतपट्टा कंपनीने निश्चित केला आहे. मंगळवारी भागविक्रीच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळून, कंपनीने १.९८ पट (जवळपास दुप्पट) भरणा पूर्ण करणारे अर्ज आकर्षित केले आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज
टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री २२ नोव्हेंबरपासून खुली झाली असून गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ४७५ रुपये ते ५०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. भागविक्रीतून कंपनीचा ३,०४२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ३० आणि त्यानंतरच्या ३० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, या भागविक्रीत सहभागी होता येईल.
हेही वाचा : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटतर्फे नव्या फंडाचा शुभारंभ; वर्तणूक शास्त्रावर आधारित भारताचा पहिला फंड
फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस
वित्त क्षेत्रातील कंपनी असलेल्या फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसचा ‘आयपीओ’देखील २२ नोव्हेंबरपासून खुला झाला असून गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत या भागविक्रीत सहभागी होता येईल. कंपनीचा यातून १,०९२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस असून त्यासाठी १३३ ते १४४ रुपये असा विक्रीचा किंमतपट्टा तिने निश्चित केला आहे.
गांधार ऑइल रिफायनरी इंडिया
व्हाइट-ऑइल उत्पादक कंपनी गांधार ऑइल रिफायनरीदेखील २२ नोव्हेंबरपासून समभाग विक्री करणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना भागविक्रीमध्ये सहभागी होता येईल. यासाठी १६० ते १६९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. मुंबईस्थित कंपनीचा या माध्यमातून ५००.५६ कोटींहून अधिक निधी उभारण्याचा मानस आहे.
हेही वाचा : बायजूवर ईडीची धाड, ९ हजार कोटींचा घोटाळा पकडला
फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज
मुंबईस्थित स्टेशनरी व लेखनसामग्री उत्पादक फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीजने भागविक्रीसाठी २८८ ते ३०४ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून त्या माध्यमातून तिला ५९३ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. प्रवर्तक असलेल्या राठोड कुटुंबाकडून ३०१ कोटी मूल्याच्या समभागांची ‘ओएफएस’च्या माध्यमातून तर २९२ कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे.
रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी
बीटूबी रि-कॉमर्स क्षेत्रातील या कंपनीने २२ नोव्हेंबरपासून भागविक्री सुरू केली असून २४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना समभागांसाठी अर्ज करता येईल. ‘एनएसई इमर्ज’ या एसएमई कंपन्यांसाठी रचि बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या भागविक्रीसाठी कंपनीने १३६ ते १४० रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, या माध्यमातून कंपनी २१ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.