Reliance Industries Update: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनी ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. कंपनीने नियामक फायलिंगमध्ये स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर तीन भावंडांना गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
९० टक्क्यांहून अधिक भागधारकांनी मतदान केले
रिलायन्स इंडस्ट्रीजने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, हा ठराव २६ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुमताने मंजूर करण्यात आला होता. ईशा अंबानी यांना एकूण ९८.२१ टक्के मते मिळाली आहेत, तर आकाश अंबानी यांना ९८.०६ टक्के मते मिळाली आहेत, तर अनंत अंबानी यांना एकूण ९२.६७ टक्के मते मिळाली आहेत.
हेही वाचाः Money Mantra : NPS खात्यात नॉमिनी त्वरित कसे अपडेट करायचे? जाणून घ्या अतिशय सोपी प्रक्रिया
मंडळाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली
२८ ऑगस्ट २०२३ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, ईशा, आकाश, अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्डात बिगर कार्यकारी संचालक म्हणून समाविष्ट केले जातील. या तिघांचाही बोर्डात समावेश करण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती. पण भागधारकांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनीही या तिन्ही भावंडांचा बोर्डात समावेश करण्यास मान्यता दिली आहे. नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता.
पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याची तयारी
ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे वेगवेगळे व्यवसाय हाताळत आहेत. रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानीकडे आहे, याशिवाय तिला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आले आहे. आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या टेलिकॉम आणि डिजिटल व्यवसायासाठी जबाबदार आहेत, तर अनंत अंबानी ऊर्जा व्यवसायासाठी जबाबदार आहेत. ऑगस्ट महिन्यातील एजीएमला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले होते की, ते रिलायन्सच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार करतील. आकाश, ईशा आणि अनंत यांचे मार्गदर्शन हे त्याचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. जेणेकरून ते सामूहिक नेतृत्व देऊ शकतील आणि येत्या दशकात रिलायन्स समूहाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतील.