गेल्या आठवड्याच्या शेवटी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. पूर्व युरोपमध्ये दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धानंतर आता पश्चिम आशियामध्ये नवे युद्ध सुरू झाले आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती एका झटक्यात ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्‍चिम आशियाचा प्रदेश संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जगाच्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांश गरजेचा पुरवठा याच भागातून केला जातो. हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा अस्थिर झाली आहे. इस्रायलवर हमासने एवढा भयंकर हल्ला चढवला आहे की, कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. गेल्या ५० वर्षांतील इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयंकर हल्ला असल्याचे विश्लेषक मानत आहेत.

हेही वाचाः …तर ‘त्या’ प्रकल्पांची नोंदणीच १० नोव्हेंबरनंतर थेट रद्दच होण्याची शक्यता

सध्या तरी युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत

हमासच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने महिला, मुले आणि वृद्धांसह हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यानंतर इस्रायलने अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धाबाबत जगही दोन छावण्यांमध्ये विभागलेले दिसते. सध्या युद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

हेही वाचाः DGGI ने अनिल अंबानींच्या कंपनीला ९२२ कोटींची पाठवली GST नोटीस

सध्या कच्च्या तेलाची किंमत एवढी

ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. युद्ध-संबंधित प्रीमियमचे युग बाजारात परत आले आहे आणि यामुळे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल ८७ डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. रॉयटर्सच्या एका बातमीनुसार, ब्रेंट क्रूडमध्ये ४.१८ डॉलर किंवा ४.९९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि ती प्रति बॅरल ८८.७६ डॉलरवर पोहोचली आहे. तर WTI ५.११ टक्क्यांनी वाढून ८७.०२ डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

एक आठवड्यापूर्वी मोठी घसरण

कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा किमती पुन्हा कमी व्हायला लागल्या होत्या. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या भविष्यात सुमारे ११ टक्के आणि डब्ल्यूटीआयच्या भविष्यात सुमारे ८ टक्के घट झाली. मार्चनंतर एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र, आता कच्च्या तेलात वाढ झालेला ट्रेंड परत आला आहे.

इराणचा पुरवठा पुन्हा बंद होण्याची भीती

खरे तर हमासने इस्रायलवर केलेला हल्ला इराणशी जोडला जात आहे. या हल्ल्यात इराणच्या गुप्तचरांचा थेट हात असल्याचा आरोप होत आहे. इस्रायलने या हल्ल्याचा आरोप इराणवर केला आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. इराणने या हल्ल्याबद्दल हमासचे कौतुकही केले आहे. आता अशा परिस्थितीत इराणचा पुरवठा पुन्हा बंद होण्याची भीती बाजाराला आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war boosts crude oil prices jumps 5 percent in a flash vrd
Show comments