मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे अविरत निर्गमन आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभाग विक्रीच्या माऱ्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही घसरले. सलग दुसऱ्या सत्रात घसरण होऊन, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५३.१२ अंशांनी म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी घसरून ७९,३८९.०६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६५४.२५ अंश गमावत ७९,२८७.९३ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३५.५० (०.५६ टक्के) अंशांची घसरण झाली आणि तो २४,२०५.३५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा : Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
सेन्सेक्समध्ये टेक महिंद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि मारुती सुझुकीच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. याउलट, लार्सन अँड टुब्रोचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांची कामगिरी बाजार घसरणीतही उल्लेखनीय राहिली.
हेही वाचा : ‘एनएसई’कडून २० कोटी ग्राहक संख्येचा टप्पा
अमेरिकी बाजारात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांमधील कमकुवतपणामुळे देशांतर्गत आघाडीवर आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा अनुभवला. दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या कमाईतील अपेक्षाभंगामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र उर्वरित पुढील सहा महिन्यांत सरकारी खर्चातील वाढ आणि प्रमुख पायाभूत क्षेत्रातील संभाव्य वाढीच्या शक्यतेने भांडवली बाजारातील वातावरण आशादायी राहण्याची शक्यता आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.