मुंबई: बहुविध व्यवसायांत कार्यरत आयटीसी लिमिटेडने तिचा हॉटेल व्यवसाय विलग करून, ‘आयटीसी हॉटेल्स लिमिटेड’ ही स्वतंत्र कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याच्या पूर्वघोषित योजनेला प्रत्यक्ष रूप देण्याचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे.
नव्याने प्रस्तावित आयटीसी हॉटेल्सचे समभाग मिळविण्यास आयटीसीच्या भागधारकांची पात्रता निर्धारित करणारी ६ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेला किंवा त्याआधीपासून आयटीसीचे भागधारक म्हणून पुस्तकी नोंद असलेल्यांना नवीन कंपनीचे समभाग मिळविता येतील. उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने या रेकॉर्ड तारखेला नियमानुसार मंजुरी दिल्याचे बुधवारी भांडवली बाजाराला सूचित केले. आयटीसीच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १० समभागांमागे आयटीसी हॉटेल्सचा एक समभाग मिळेल.
हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याचे दर आज पुन्हा वाढले! काय आहे आजचा २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर
आयटीसीच्या भागधारकांनी जून २०२४ मध्ये झालेल्या मतदानांत, आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणाला ९९.६ टक्के अशी बहुमताने मंजुरी दिली आहे. हे विलगीकरण अधिकृतपणे १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. आयटीसी समूहाकडून विविध सहा नाममुद्रांखाली देशभरात १३ हजारांहून अधिक खोल्या असलेल्या १४० हॉटेल मालमत्ता सध्या चालविल्या जात असून, त्या सर्व नवीन कंपनीच्या आधिपत्याखाली येतील. पुढील ४ ते ५ वर्षांत खोल्यांची संख्या १८ हजारांवर आणि एकूण मालमत्ता २०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे.