नवी दिल्ली : वैयक्तिक करदात्यांकडून भरल्या जाणाऱ्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या (आयटीआर) संख्येत गेल्या नऊ वर्षांत ९० टक्क्यांची वाढ झाली अजून वर्ष २०२१-२२ मध्ये त्यांची संख्या ६.३७ कोटींवर पोहोचली आहे. वर्षागणिक त्यात वाढ होत असून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (करनिर्धारण वर्ष २०२३-२४) प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येने ७.४१ कोटींचा टप्पा गाठला आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२३ चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०२३ होती. यंदा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत ५३ लाखांची भर पडली आहे. करनिर्धारण वर्ष २०१३-१४ मधील ३.३६ कोटींवरून कर निर्धारण वर्ष २०२१-२२ पर्यंतच्या नऊ वर्षात ही संख्या ६.३७ कोटींवर पोहोचली आहे. वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच, उत्पन्नाच्या विविध श्रेणींमध्ये वैयक्तिक करदात्यांनी भरलेल्या विवरणपत्रात वाढ झाली आहे. यावरून वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न वाढत असल्याचेदेखील स्पष्ट होते.
उच्च उत्पन्न श्रेणीत स्थलांतरणाचा सकारात्मक कल
उच्च उत्पन्न श्रेणीतील वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पाच ते १० लाख रुपये, आणि १० ते २५ लाख रुपयांच्या श्रेणीतील उच्च उत्पन्नाच्या श्रेणीतील करदात्यांची संख्या नऊ वर्षांत अनुक्रमे तब्बल २९५ टक्के आणि २९१ टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा : टाटांकडून देशात आयफोनचे उत्पादन, बंगळूरुनजीक ‘विस्ट्रॉन’ प्रकल्पाचे संपादन मार्गी
वैयक्तिक करदात्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ
वैयक्तिक करदात्यांच्या एकूण उत्पन्नात सुमारे ५६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१३-१४ मधील सरासरी ४.५ लाखांवरून ते २०२१-२२ मध्ये ७ लाखांवर पोहोचले आहे. वैयक्तिक करदात्यांमधील आघाडीच्या १ टक्का करदात्यांच्या उत्पन्नात ४२ टक्के वाढ झाली आहे. तसेच तळाकडील म्हणजेच कमी उत्पन्न असलेल्या २५ टक्के करदात्यांच्या उत्पन्नात सरासरी ५८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. प्राप्तिकरदात्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाढत्या उत्पन्नाचे प्रतिबिंब म्हणून, निव्वळ थेट संकलन आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६.६१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. जे आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ६.३८ लाख कोटी रुपये होते.