पीटीआय, नवी दिल्ली
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरने जूनअखेर संपलेल्या तिमाहीत १ लाखांहून अधिक मोटारींची विक्री केली. कंपनीच्या मोटारींच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत २९ टक्के वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवर चिप आणि इतर सुट्या भागांचा पुरवठा सुरळीत झाल्याने कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या १ लाख १ हजार ९९४ मोटारींची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यात २९ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा – ‘आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी’कडून पदार्पणातच ९४ टक्के परतावा
कंपनीकडे तिमाहीअखेरपर्यंत मागणी नोंदविलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ८५ हजार झाली आहे. मार्चअखेरीस ही संख्या २ लाखांवर होती. चिप आणि इतर सुट्या भागांचा पुरवठा सुरळीत होऊ लागल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी कमी होत आहे. रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि डिफेंडर या मोटारींना जास्त मागणी असून, त्यांचा एकूण विक्रीत वाटा ७६ टक्के आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
टाटा टियागोचा ५ लाखांचा टप्पा
भारतीय बाजारपेठेत ५ लाखांच्या विक्रीचा टप्पा टियागो मोटारीने गाठला आहे, अशी माहिती टाटा मोटर्सने दिली. टियागो ही टाटा मोटर्स कंपनीची सध्या सर्वांत परवडणारी मोटार आहे. मागील १५ महिन्यांत १ लाख टियागो मोटारींची विक्री झाली आहे.