नवी दिल्ली : जपानच्या सॉफ्टबँकने पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सुमारे ४,५६० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. सॉफ्टबँकेने पेटीएममध्ये १.६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १३,४०० कोटींची गुंतवणूक केली होती. सरलेल्या जून महिन्यात तिने पेटीएममधील संपूर्ण हिस्सेदारी विकून शून्यावर आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेटीएममधील गुंतवणुकीच्या तुलनेत ऑनलाइन विमा विक्री सुविधा देणाऱ्या पॉलिसीबाझारमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सॉफ्टबँक व्हिजन फंडाने चांगला नफा मिळवला आहे. नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित व्यवसायात गुंतवणुकीसाठी व्हिजन फंडाची सॉफ्टबँकेने स्थापना केली आहे. या फंडाने पॉलिसीबाझारमध्ये १,६७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावर त्याला सुमारे ३,३०० कोटींचा नफा झाला आहे. याबरोबर घरोघरी खाद्यपदार्थांचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोच्या समभाग विक्रीतूनदेखील ५४५ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

हेही वाचा >>> जगभरातील बाजारांच्या पुनर्उभारीसह; ‘सेन्सेक्स’ची ८७५ अंशांनी उसळी

सॉफ्टबँकने गेल्या दशकभरात भारतातील तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांचा पोर्टफोलिओ या फंडामार्फत तयार केला असून, त्यायोगे सुमारे या ८८,७०० कोटी (१०.६ अब्ज डॉलर) रुपयांची गुंतवणूक केली आहे. फंडाने आजपर्यंत त्यातून सुमारे ५०,००० कोटींहून (६ ते ६.८ अब्ज डॉलर) काढून घेतले आहेत. तर ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय आणि युनिकॉमर्समधून सुमारे ७,०८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर १०६ टक्के अधिक नफा कमावला आहे. येत्या आठवड्यात ओला इलेक्ट्रिक आणि युनिकॉमर्स भांडवली बाजारात सूचिबद्ध होतील.

सॉफ्टबँक तीन कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीतून १,२८७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री करणार आहे. प्रारंभिक समभाग विक्रीनंतरही तिच्याकडे ११,०११ कोटी रुपये मूल्याचे समभाग शिल्लक राहणार आहेत.

भारतात १.१ लाख कोटींची गुंतवणूक

सॉफ्टबँकेने भारतीय कंपन्यांमध्ये एकूण सुमारे १.१ लाख कोटी म्हणजेच १३.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जी तिच्या जागतिक गुंतवणुकीच्या ९ टक्के आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan s softbank suffer loss over rs 4500 crore on investment in paytm print eco news zws