ॲमेझॉनचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस हे ई-कॉमर्स कंपनीचे जवळपास ५ डॉलर अब्ज किमतीचे शेअर्स विकण्याची योजना आखत आहेत, असे नियामक फायलिंगमधून दिसून आलं आहे. ॲमेझॉन स्टॉकने विक्रमी उच्चांक गाठल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी बाजार खुला झाल्यानंतर २५ मिलिअन शेअर्सच्या प्रस्तावित विक्रीचा खुलासा करण्यात आला होता. सत्रादरम्यान स्टॉकने २००.४३ डॉलरचा सर्वकालीन उच्चांक गाठला. डाऊ जोन्स इंडस्ट्रीअल ॲव्हरेज इंडेक्समध्ये ३० टक्के नफा झाला आहे.

या शेअर्सची विक्री केल्यानंतर बेझोस सुमारे ९१२ मिलिअन ॲमेझॉन शेअर्स किंवा ८.८ थकबाकीदार शेअर्स असतील. २०२३ मध्ये स्टॉक ८० टक्के वाढल्यानंतर त्याने फेब्रुवारीमध्ये अंदाजे ८.५ बिलिअन डॉलर किमतीचे शेअर्स विकले होते. फॉर्ब्सच्या मते बेझोस हे २१४.३ डॉलर अब्ज संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचेही संस्थापक आहेत. या कंपनीने मे महिन्यात सहा व्यक्तींचा क्रू लॉन्च केला होता.

ॲमेझॉनचे शेअर्स मंगळवारी २०० डॉलरवर बंद झाले. १९९७ च्या लिस्टिंगनंतरचे ही सर्वोच्च उसळी होती. जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे कंपनीच्या क्लाउड व्यवसायाला फायदा होण्याची अपेक्षा असल्याने कंपनीचा स्टॉक यावर्षी ३२ टक्के वाढला आहे.

हेही वाचा >> जेफ बेझोसच्या माजी पत्नीने १० अब्ज डॉलरचे शेअर्स विकले, घटस्फोटानंतर सेटलमेंटमध्ये कंपनीतील ४ टक्के हिस्सा मिळवला होता

माजी पत्नीनेही विकले होते शेअर्स

तर, ॲमेझॉनचे संस्थापक सीईओ जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी कंपनीचे ६.५३ कोटी शेअर्स जानेवारीतच विकले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शेअर्सची ही विक्री गेल्या वर्षी झाली होती, ज्याची माहिती जानेवारी महिन्यात नियामक फायलिंगमध्ये देण्यात आली. जेफपासून घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेन्झीला सेटलमेंटमध्ये ४ टक्के शेअर्स मिळाले. त्यांची किंमत तेव्हा सुमारे ३६ अब्ज डॉलर्स होती. यासह मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सामील झाली होती. तिने २०१९ मध्येच तिची अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत त्यांनी विविध धर्मादाय कार्यांसाठी १६.५ अब्ज डॉलर्स दान केले आहेत.