पीटीआय, नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या ग्राहकसंख्येत मे महिन्यात एकत्रिपणे ३४.४ लाख नवीन ग्राहकांची भर पडली आहे. तर कर्जजर्जर असलेल्या व्होडाफोन-आयडियाची पीछेहाट कायम असून तिने ग्राहक गमावले आहेत, असे ट्रायने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे २१.९ लाख नवीन वायरलेस वापरकर्ते जोडले आहेत. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने मे महिन्यात १२.५ लाख मोबाइल ग्राहक जोडले. मात्र व्होडाफोन आयडियाने या महिन्यात ९.२४ लाख मोबाइल ग्राहक गमावले. रिलायन्स जिओच्या मोबाइल ग्राहकांची संख्या मे महिन्यात ४७.४६ कोटींवर पोहोचली आहे. जी एप्रिलमध्ये ४७.२४ कोटी होती. व्होडाफोन आयडियाने ग्राहकसंख्येत घट नोंदवल्याने त्यांचा ग्राहकांची संख्या ९.२४ लाखांनी घटून २१.८१ कोटीपर्यंत घसरली आहे.मे महिन्यात सुमारे १.२ कोटी ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (एमएनपी) अर्ज केला. भारताचे एकूण ब्रॉडबँड ग्राहक मे २०२४ अखेर ९३.५ कोटीपर्यंत वाढले आहेत.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
विद्यमान महिन्यात तीनही आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी २२ टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली. परिणामी ग्राहकांच्या महिन्याकाठी दूरसंचार सेवेवर होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिमाणसी महसुलात वाढ होणार आहे.
© The Indian Express (P) Ltd