पीटीआय, नवी दिल्ली
शीतपेये क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी कोका-कोलाने भारतातील तिचा बॉटलिंग व्यवसाय असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमधील (एचसीसीबीएल) ४० टक्के हिश्श्याची ज्युबिलंट भारतीय समूहाला विक्री केल्याचे बुधवारी जाहीर केले. दोन्ही कंपन्यांनी या संपादन व्यवहाराची रक्कम जाहीर केली नसली तरी काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या अंदाजानुसार, हा व्यवहार १०,००० कोटी रुपये ते १२,५०० कोटी रुपयांदरम्यान पार पडला असण्याची शक्यता आहे.
कोका-कोलासाठी ही गुंतवणूक एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असे कोका-कोला इंडियाचे अध्यक्ष संकेत रे म्हणाले. भारतीय समूहाचा या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा कंपनीला मिळणार असून यामुळे स्थानिक बाजारपेठेसह ग्राहकांना मूल्यवर्धनाचा फायदा मिळेल. भारत ही जागतिक स्तरावर कोका-कोलाची पाचवी मोठी बाजारपेठ आहे.
हेही वाचा : इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
कोका-कोलाच्या बॉटलिंग व्यवसायातील हिस्सा खरेदीमुळे ज्युबिलंट भारतीय समूह देशातील पेय उद्योगातील महत्त्वाचा दावेदार बनला आहे. हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेससाठी सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्ससह आठ श्रेणींमध्ये ३७ उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करते. तसेच ज्युबिलंट फूडवर्क्स देशात डॉमिनोज पिझ्झा विक्रीची दालने चालवते.
हेही वाचा : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
स्पर्धक पेप्सिकोच्याच पाऊलवाटेने
अमेरिकेत अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या कोका-कोलाच्या मालमत्ता-विक्री धोरणाचा भाग म्हणून जागतिक स्तरावर बॉटलिंग व्यवसायाची विक्री केली जात आहे. कोका-कोलाची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या पेप्सिकोनेदेखील बॉटलिंगसंबंधाने कार्य भारतातील वरुण बीव्हरेजेस लिमिटेडकडे पूर्णत्वाने सोपविले आहे. आता त्याच पावलांचे अनुकरण कोका-कोलाने केले आहे.