वाहन निर्मात्या ‘किया’ने नवीन रूपातील आणि बहुप्रतीक्षित ‘सेल्टोस’ या एसयूव्ही वाहनाचे मंगळवारी येथे अनावरण केले. नव्या युगातील ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या या दमदार वाहनाद्वारे स्मार्ट आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल, असा दावा करण्यात आला. ‘सेल्टोस’च्या माध्यमातून आम्ही भारतात पाऊल टाकले होते. तेव्हापासून वाहन बाजारपेठेचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या प्रवासात ‘सेल्टोस’चा मजबूत वारसा मोलाचा ठरेल, असा आमचा विश्वास आहे.
नवीन ‘सेल्टोस’मुळे वाहन बाजारपेठेतील दहा टक्के हिस्सा मिळवण्याचे लक्ष्य आहे, असे किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी ताए-जिन पार्क म्हणाले. सेल्टोस ही ‘किया कॉर्पोरेशन’ची सर्वात मोठी नाममुद्रा असून जगभरात विक्री होणाऱ्या १० किया मोटारींमध्ये एक ‘सेल्टोस’ असते, यावरून तिची लोकप्रियता निदर्शनास येते. नवीन सेल्टोस मध्यम एसयूव्ही प्रकारातील तिच्या वर्गातील सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह आणि जबरदस्त रचनेसह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘किया इंडिया’च्या एकूण विक्रीमध्ये ‘सेल्टोस’चे ५५ टक्के योगदान आहे.
हेही वाचाः मोठी बातमी! मोदी सरकार बीपीसीएलला विकून १८ हजार कोटी रुपये जमवणार
नवीन सेल्टोस सर्वात आधुनिक १७ वैशिष्ट्यांसह आणि या प्रकारातील सर्वाेत्तम २ एडीएएसने सुसज्ज आहे. अतिरिक्त १५ मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन सेल्टोसमध्ये उल्लेखनीय ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पुढचा टप्पा गाठला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.