पीटीआय, नवी दिल्ली
निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने त्या वाढत्या खर्चाला भरून काढण्यासाठी किआ इंडियाने एप्रिलपासून वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिल २०२५ पासून लागू होणारी ही किंमत वाढ प्रामुख्याने सुटे भाग आणि त्यासंबंधित वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीशी संबंधित वाढत्या खर्चामुळे आहे.
ग्राहकांना नेहमीच स्पर्धात्मक किमतीत सर्वोत्तम वाहने देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. किमतीत बदल करणे आव्हानात्मक ठरेल हे माहिती असले तरी, ग्राहकांना किआकडून अपेक्षा असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहनांचे वितरण सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे किआ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) हरदीप सिंग ब्रार म्हणाले. ग्राहकांवर होणारा परिणाम मर्यादित करण्यासाठी, किआ वाढीव खर्चाचा एक महत्त्वाचा भाग सोसत राहिले, जेणेकरून किंमत समायोजन ग्राहकांसाठी शक्य तितके पेलवणारे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्ससह अनेक वाहन उत्पादकांनी पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा आधीच केली आहे.
इतर कंपन्यांकडूनही किंमत वाढीचे संकेतमारुती सुझुकी इंडियाने देखील पुढील महिन्यापासून त्यांच्या विविध श्रेणीतील वाहनांच्या किमती ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत असल्याचे सूतोवाच केले आहे. जर रुपया युरोच्या तुलनेत घसरत राहिला तर एप्रिलमध्ये मर्सिडीज वाहनांच्या किमती वाढवू शकते, असे मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी मंगळवारी सांगितले. युरो आधीच प्रति रुपया ९५ च्या पातळीवर पोहोचला आहे. एप्रिलपासून ही वाढ अशीच सुरू राहिल्यास किंमती वाढू शकतात. रुपयाच्या तुलनेत युरोचा विनिमय दर या वर्षी सतत घसरत आहे. १२ फेब्रुवारी रोजी ८९.९६ च्या पातळीवरून, १२ मार्च रोजी युरोच्या तुलनेत विनिमय दर ९५.१३ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार. मंगळवारी एका युरोचे मूल्य ९४.५५ रुपये होते. कंपनीला परकीय चलन विनिमय दरातील कोणत्याही प्रतिकूल चढ-उतारांना प्रतिसाद द्यावाच लागतो. पाच रुपयांची वाढ ही विनिमय दरात जवळजवळ पाच ते आठ टक्के वाढ असते, असे अय्यर म्हणाले.