पुणे: कायनेटिक ग्रीनने ई-लुना ही इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली असून, ‘गिग’ कामगारांसाठी प्राधान्याने ही स्कूटर उपलब्ध करून देण्यास कंपनीने सुरूवात केली आहे. कंपनीने बिग बास्केट या किराणा वस्तू घरपोच पोहोचत्या करणाऱ्या ऑनलाइन मंचाचे भागीदार सेफ ॲण्ड सिक्युअर डिलिव्हरी सोल्यूशन्सला १३० ई-लुना वितरित केल्या आहेत.
कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, सेफ ॲण्ड सिक्युअर डिलिव्हरी सोल्यूशन्सचे संस्थापक फैजल शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आगामी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘गिग’ कामगारांकडून ५० हजार ई-लुना स्कूटरला मागणी अपेक्षित आहे, असे सांगून मोटवानी म्हणाल्या की, ई-लुना ही शहरातील वाहतुकीचे भविष्य पर्यावरणपूरक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. शहरांतर्गत प्रवासासाठी ई-लुनाचा वापर व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही गिग कामगारांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात त्यांच्याकडून मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यांच्या कामाला साजेशी अशी या दुचाकीची रचना आहे. ग्राहकांनी ई-लुना स्कूटरला चांगली पसंती दिली आहे.
हेही वाचा >>>घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री
यावेळी शेख म्हणाले की, ई-लुनामुळे कामकाजात मोठा बदल होण्यासह, गिग कामगार प्रदूषण कमी करण्यास हातभार लावतील. याचबरोबर इंधनाचा खर्च, वाहनाची मजबुती आणि कार्यक्षमता यामुळे गिग कामगारांचा नफा वाढेल.