जर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगले दिवस येणार आहेत. कारण टायटन कंपनीने पुढील ५ वर्षांत अभियांत्रिकी, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा अॅनालिटिक्स, मार्केटिंग आणि विक्री आणि इतर क्षेत्रात ३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. टायटन कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. कंपनी डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि नवीन युगातील इतर कौशल्ये यांसारख्या क्षेत्रांसाठी कुशल व्यावसायिक शोधत आहे.
टायटन कंपनीच्या प्रमुख (मानव संसाधन – कॉर्पोरेट आणि रिटेल) प्रिया एम. पिल्लई म्हणाल्या, “आम्ही पुढील पाच वर्षांत १,००,००० कोटींचा व्यवसाय होण्यासाठी एक रोमांचक प्रवास सुरू करीत आहोत. आम्ही पुढील पाच वर्षांत ३ हजार नवीन लोकांची भरती करणार आहोत.
त्या म्हणाल्या की, “आमचा विश्वास आहे की, आमची माणसे वाढवण्याबरोबरच आम्ही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी दिल्यास कंपनीला फायदा होईल. यामुळे कंपनीच्या वाढीला आणि नवोन्मेषाला गती मिळेल, तसेच उद्योगात आमचे स्थान मजबूत होईल.सध्या कंपनीचे ६० टक्के कर्मचारी महानगरांमध्ये कार्यरत आहेत आणि ४० टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आहेत.