Top 5 biggest stock market crashes in India’s history : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या व्यापरकरामुळे अमेरिकेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात देखील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळाले.
आज (७ एप्रिल) सेन्सेक्स जवळपास ४ हजार अंकांनी तर निफ्टी ५० जवळपास २१,७५० च्या खाली घसरला. तर बेंचमार्क निफ्टी ५० याची वाटचाल ही एक वर्षातील निच्चांकांकडे झाली. तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हे १० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी सेन्सेक्स ३,९१४.७५ अंकांनी किंवा ५.१९ टक्क्यांनी घसरून ७१,४४९.९४ वर उघडला, तर निफ्टी ५० ने १,१४६.०५ अंकांनी किंवा ५ टक्क्यांनी घसरणीसह २१,७५८.४० वर ट्रेंडिंगला सुरूवात केली. ही आजवरच्या इतिहासात एका दिवसात झालेल्या सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक आहे.
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपेटलायजेशन ४०३ लाख कोटींहून घसरून ३८७ लाख कोटींवर पोहचल्याने गुंतवणूकदारांचे काही मिनिटांच्या आतच जवळपास १७ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले.
७ एप्रिल रोजी झालेल्या जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे १९ ऑक्टोबर १९८७ रोजीच्या ‘ब्लॅक मंडे’च्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या दिवशी झालेली घसरण ही पहिले आधुनिक जागतिक आर्थिक संकट मानले जाते. दरम्यान भारतात देखील अनेकदा एकाच दिवशी शेअर बाजारत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ५ सर्वात मोठ्या शेअर बाजारातील घसरणीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१) हर्षद मेहता घोटाळा (१९९२)
भारतीय शेअर बाजारातील पहिली सर्वात मोठी घसरण १९९२ मध्ये पाहायला मिळीली, जेव्हा हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला होता. हा जवळपास ४ हजार कोटींचा घोटाळा उजेडात आला तेव्हा सेन्सेक्स जोरात आपटला होता. भारतीय शेअर बाजारात २८ एप्रिल १९९२ रोजी तोपर्यंतची सर्वात मोठी एका दिवसात झालेली घसरण पाहायला मिळाली. यावेळी सेन्सेक्स ५७० अंकांनी (१२.७ टक्के) कोसळला होता. हा घोटाळा झाल्यानंतर भारताच्या आर्थिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले. ज्यामध्ये सेबीच्या अधिकारात वाढ करण्यात आली.
२) केतन पारेख घोटाळा (२००१)
२००१ मध्ये ब्रोकर केतन पारेख यांने केलेल्या घोटाळ्यामुळे शेअर बाजार असाच खाली कोसळला होता. जेव्हा हा घोटाळा उजेडात आला तेव्हा बाजारात एकच गोंधळ उडाला. २ मार्च २००१ साली सेन्सेक्स १७६ अंकांनी (४.१३ टक्के) कोसळला. याच काळात गुजरातमध्ये भूकंप झाला होता, याचा देखील फटका शेअर बाजाराला बसला.
३) निवडणुकीचे धक्कादायक निकाल (२००४)
२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाचा देखील शेअर बाजाराला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत यूपीएचा अनपेक्षित विजय झाला आणि एनडीए पारभूत झाली. यामुळे आर्थिक सुधारणा सुरू राहतील की नाही याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये साशंकता निर्माण झाली. १७ मे २००४ रोजी सेन्सेक्स एकाच दिवसात ११.१ टक्के घसरला. घाबरलेल्या लोकांनी भीतीने विक्री सुरू केली आणि दिवसभरात शेअर मार्केट दोन वेळा थांबवावे लागले लागले. अखेर यूपीएने सुधारणा सुरू ठेवण्याबाबत संकेत दिल्यानंतर बाजारात स्थिरता आली.
4) जागतिक आर्थिक संकट (२००८)
२००८ मध्ये झालेली घसरण ही अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा भाग होती. जागतिक अर्थिक मंदीच्या भीतीने आणि परदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने २१ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स १,४०८ अंकांनी (७.४ टक्के) घसरला. त्यानंतर येत्या काही महिन्यात सेन्सेक्स जवळपास ६० टक्क्यांनी घसरला. हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात वाईट काळ होता.
५) करोना महामारी (२०२०)
कोरोना महामारीच्या काळात देखील भारतीय शेअर बाजारात एका दिवसातील सर्वात गंभीर स्वरूपाची घसरण पाहायला मिळाली. २३ मार्च २०२० रोजी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने सेन्सेक्स ३,९३५ अंकांनी (१३.२ टक्के) घसरला. जागतिक मंदीच्या भीतीमुळे यापूर्वी कधीच झाली नव्हती अशी विक्री झाली. पण नंतर फिस्कल आणि मॉनेटरी सपोर्टमुळे बाजार काही महिन्यात पूर्ववत झाला.