मुंबई : केंद्र सरकारने बासमती तांदळावरील प्रति टन ९५० डॉलरचे किमान निर्यात मूल्य हटविले आहे. याचा फायदा कोहिनूर फूड्स कंपनीला सोमवारी झाला. भांडवली बाजारात कंपनीच्या समभागाने २० टक्क्यांची उसळी घेतली.
केंद्र सरकारने बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य शुक्रवारी (ता.१३) हटविले. निर्यातीत वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले होते. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश अपेडाला देण्यात आले आहेत. त्यामुळे अपेडा बासमती तांदळाच्या निर्यात करारांवर बारकाईने लक्ष ठेवून निर्यातीचे जास्त दर लावल्यास कारवाई करणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचा फायदा तांदूळ कंपन्यांना झाला. मुंबई शेअर बाजारात सोमवारी कोहिनूर फूड्सच्या समभागात २० टक्के वाढ झाली तर त्याखालोखास एलटी फूड्स ९.७२ टक्के, केआरबीएल ७.६७ टक्के, चमन लाल सेटिया एक्स्पोर्ट्स ५.९२ टक्के अशी वाढ झाली. देशातून २०२२-२३ मध्ये ४५.६ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली होती आणि त्याचे मूल्य ४८ अब्ज डॉलर होते.