पुणे: मोटारींसाठी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यासाठी मर्सिडीज बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडियाशी (एबीआरडीआय) भागीदारीची घोषणा केपीआयटी टेक्नॉलॉजीजने सोमवारी केली. या भागीदारीमुळे नाविन्यपूर्ण संशोधन बाजारपेठेत पोहोचण्याचा वेळ कमी होणार आहे.

वाहन निर्मात्या मर्सिडीज बेंझकडून संगणकीय प्रणालीतील विकास भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. कंपनीने डिजिटल स्थित्यंतरावर लक्ष केंद्रित केल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून एकात्मिक संगणकीय प्रणाली तयार करून वाहनांची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. याचबरोबर वाहन चालविण्याच्या चालकाच्या अनुभवातही सुधारणा होणार आहे. मर्सिडीज बेंझकडून ग्राहकांना नियमितपणे सॉफ्टवेअर अपडेट दिले जाणार असून, त्यामुळे कंपनीच्या मोटारी त्यांच्या कार्यकाळात तंत्रज्ञानदृष्ट्या कायम अद्ययावत राहण्यास मदत होणार आहे, अशी माहिती केपीआयटी टेक्नॉलॉजीजने दिली आहे.

याबाबत कंपनीचे मुख्याधिकारी किशोर पाटील म्हणाले की, मर्सिडीज बेंझला १०० वर्षांहून अधिक काळाचा वारसा आहे. उत्कृष्ट आणि ग्राहककेंद्री उत्पादनांच्या विकासात एमबीआरडीआयसोबत भागीदारीची महत्त्वाची भूमिका असेल. वाहनांसाठी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यासोबतच डिजिटल नाविन्याचा याकामी अंतर्भाव केला जाणार आहे.