पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजने मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत २४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ४८.८४ टक्के वाढ झाली आहे. केपीआयटीने चौथ्या तिमाहीत १,५२८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १,३१७ कोटी रुपये होता. त्यात आता १५.९७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीच्या एकूण खर्चात १४.७० टक्क्यांनी वाढ होऊन तो १,२७२ कोटी रुपयांवर गेला आहे.
कंपनीने सलग १९ व्या तिमाहीत सकारात्मक वाढ नोंदविली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रतिसमभाग ६ रुपये लाभांश जाहीर केला आहे. पाथपार्टनर या केपीआयटीच्या संपूर्णपणे मालकीच्या उपकंपनीचे, पितृकंपनीत विलीनीकरण करण्यासही संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
याबाबत कंपनीचे सहसंस्थापक व अध्यक्ष रवी पंडित म्हणाले की, वाहन क्षेत्रांवर आमचे लक्ष केंद्रित आहे. मोटारींसाठी तंत्रज्ञान सहकार्य देण्यात कंपनी आघाडीवर असून, वाणिज्य वाहन क्षेत्रातही कंपनी आता विस्तार करीत आहे. वाहन परिसंस्थेत मोठे बदल होणार असून, नाविन्यात वाढ होत असताना उत्पादनांची किंमतही कमी ठेवावी लागणार आहे. या परिसंस्थेतील विश्वासार्ह भागीदार म्हणून आम्ही वाहन निर्मिती कंपन्यांच्या यशस्वी वाटचालीस मदत करीत आहोत.