लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: सर्वांसाठी घरे आणि स्मार्ट शहरांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसह, महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांवर गतिमानतेने कामे सुरू असलेल्या देशात, बांधकाम क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तुटीच्या समस्येकडे धोरणकर्त्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत येथे आयोजित ‘वर्ल्ड ऑफ काँक्रीट इंडिया २०२३’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आले.

अत्याधुनिक काँक्रीट तंत्रज्ञान, उपकरणे आणि उद्योगाला आकार देणाऱ्या नवकल्पना प्रदर्शित करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या ‘वर्ल्ड ऑफ काँक्रीट इंडिया’चे बुधवारी सकाळी उद्घाटन झाले. शुक्रवार, २० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शन व परिषदेची यंदा नववी आवृत्ती असून, अम्बुजा सिमेंट, ॲमकेम प्रॉडक्ट्स, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, काँक्रीट ॲडिटिव्हज् अँड केमिकल्स, सिका, गोदरेज कन्स्ट्रक्शन्ससह २०० हून अधिक कंपन्या त्यांची सेवा व उत्पादने घेऊन प्रदर्शनांत सामील झाली असून, तीन दिवसांत बांधकाम उद्योगातील १० हजारांहून अधिक व्यापार प्रतिनिधींकडून प्रदर्शनाला भेट दिली जाणे अपेक्षित आहे, असे आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे संचालक रजनीश खट्टर यांनी सांगितले.

हेही वाचा… परदेशातील ५० हजार रुपयांवरील व्यवहारही रडारवर, केंद्राकडून करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती

हेही वाचा… ‘हुडको’तील ७ टक्के सरकारी हिश्शाची आज विक्री, प्रत्येकी ७९ रुपयांना समभागांत गुंतवणुकीची संधी

संपूर्ण देशाचा कायापालट वेगाने सुरू असून, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळे, गृहनिर्माण अशा प्रत्येक क्षेत्रात मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये काँक्रीटची गरज मोठी आहे. मात्र शाश्वतता, टिकाऊपणा या अंगाने उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकारही त्याच गतीने वाढायला हवा, असे महाराष्ट्राचे उप-लोकायुक्त आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रातून वाढ व विकासाची क्षमता पाहता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाच्या आव्हानाचे तातडीने समाधान होणे अपेक्षित असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एस. एन. रेड्डी यांनी मत व्यक्त केले. या रोजगारप्रवण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब जितका वाढत आहे, तितके नवनवीन यंत्र व उपकरणांचे कार्यान्वयन, देखरेखीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढत आहे, मात्र पुरवठा तितकासा नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of trained manpower in construction sector regret expressed in the inaugural session of world of concrete india print eco news asj