लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः उत्पादन क्षेत्राला गती व प्रोत्साहनाच्या भारताच्या योजना असताना, जर्मनीची विशेष रसायने क्षेत्रातील प्रमुख कंपनी लँक्सेसने औद्योगिक ग्राहकांवर केंद्रित आणि त्यांना सानुकूल उपाययोजना प्रदान करण्यासाठी ठाण्यात अत्याधुनिक ‘भारतीय उपयोजन विकास केंद्रा’च्या (आयएडीसी) अनावरणाची मंगळवारी घोषणा केली. यातून भारतातील व्यवसायात पुढील तीन वर्षांत दुपटीने वाढीचे कंपनीचे लक्ष्य आहे.

लँक्सेसने ठाण्यातील वागळे इस्टेटस्थित इमारतीतील एक संपूर्ण मजला नवीन संशोधन व विकास केंद्राला समर्पित केला आहे. सुरुवातीला तेथे लँक्सेसच्या भारतात सध्या कार्यरत असलेल्या १० व्यवसाय विभागापैकी, तीन व्यवसाय क्षेत्रांतील औद्योगिक ग्राहकांना इच्छित सेवा दिली जाईल.

नवनिर्मितीला चालना आणि ग्राहक सेवा सक्षमता वाढण्यासह, या केंद्राच्या माध्यमातून व्यवसायात लक्षणीय वाढही अपेक्षित आहे, असे लँक्सेस एजीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष मथायस झकर्ट यांनी पत्रकारांशी संवादात स्पष्ट केले. विशेषतः भारतातील व्यवसायात साधारण २०-२५ टक्क्यांच्या घरात वाटा असलेल्या टायर/ रबर प्रक्रिया तसेच बांधकाम या दोन क्षेत्रांतून अधिक महसुलाची अपेक्षा असल्याचे झकर्ट म्हणाले. चीनच्या शाघांयमधील या धर्तीच्या केंद्रानंतर, लँक्सेसचे आशियातील दुसरे मोठे केंद्र आता ठाण्यात तयार झाले आहे.

जगभरात १२,५०० कर्मचारी आणि अमेरिका, युरोप आणि आशिया असा त्रिखंडात व्यवसाय विस्तारलेल्या लँक्सेसची भारतात झगाडिया (गुजरात) आणि नागदा (मध्य प्रदेश) येथे उत्पादन प्रकल्प आहेत. देशातील व्यवसायातून कंपनीचा सध्याचा ३१.२ कोटी युरो (साधारण २,८२५ कोटी रुपये) महसूल हा मार्च २०२८ पर्यंत दुप्पट होईल असे नियोजन असून, भारत हे कंपनीसाठी महत्त्वाचे वृद्धी क्षेत्र असल्याचे झकर्ट यांनी नमूद केले. नवीन संशोधन व विकास केंद्रातील कंपनीच्या गुंतवणुकीच्या रकमेबद्दल भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले. नजीकच्या काळात ५०-६० विशेषज्ज्ञांसह भारतात जागतिक अभियांत्रिकी कार्यही स्थानांतरित करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.