मुंबई : गेल्या आठवड्यात भांडवली बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल पुन्हा एकदा ५ ट्रिलियन डॉलरपुढे पोहोचले आहे. याआधी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ५ जानेवारी २०२५ ला ‘बीएसई’तील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवलाने हा टप्पा गाठला होता.
सध्या, अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगसह चार देशांचे एकत्रित बाजारभांडवल५ ट्रिलियनपेक्षा अधिक आहे. ७ एप्रिल रोजी ‘बीएसई’तील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४.५ ट्रिलियन डॉलरखाली घसरले होते. मात्र त्यानंतर तो ५०० अब्ज डॉलरहून अधिक वधारला आहे. मुख्यतः निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप तसेच पीएसयू म्हणजेच सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या समभागांमधील चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ शक्य झाली आहे. ७ एप्रिल रोजी अमेरिकेने व्यापार शुल्क स्थगित केल्यानंतर जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तेव्हापासून, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी ९ टक्के वधारले आहेत, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ९.४ टक्के आणि १०.६ टक्के वधारले आहेत. बँक निफ्टीने ११ टक्क्यांची तर बीएसई पीएसयू निर्देशांक ७ एप्रिलपासून १० टक्क्यांची भर घातली आहे.
सध्या अमेरिकेसोबत व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटघेणार आहेत. या बैठकीत व्यापार शुल्काबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, खनिज तेलाच्या घसरत्या किमतींमुळे महागाई वाढीचा दबाव कमी होण्यास आणि व्यापार संतुलन सुधारण्यास मदत झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या दोन सत्रांमध्ये १ अब्ज डॉलरपेक्षा अधिक निव्वळ गुंतवणूक केल्यामुळे देशांतर्गत आशावाद वाढला आहे.