Calculation Of Marginal Relief : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात नवीन आयकर व्यवस्थेअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नचे उत्पन्न करमुक्त करणार असल्याचीही घोषणा केली आहे. यामुळे पगारदार व्यक्तींना वजावटीचा समावेश करून, १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर लागणार नाही.
अशात, ज्या व्यक्तींचे करपात्र उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे त्यांच्याबाबत काय? त्यांनाही १२ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर भरावा लागेल का? ज्यांचे उत्पन्न १२,१०,००० रुपये आहे त्यांना ६१,५०० रुपये कर भरावा लागणार का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, आयकर विभागाच्या मते, कलम ११५ बीएसी (१अ) अंतर्गत नवीन कर प्रणालीमध्ये, १२ लाख रुपयांपेक्षा थोडेसे जास्त उत्पन्न असलेल्या निवासी व्यक्तींनाही मार्जिनल रिलीफ किंवा मार्जिनल बेनिफिट (किरकोळ सवलत) उपलब्ध आहे. याची मर्यादा १२,७५,००० रुपये इतकी आहे.
नव्या आयकर प्रणाली अंतर्गत मार्जिनल रिलीफचा हिशेब कसा करायचा?
उदाहरणार्थ, १२, १०,०००/- रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला, मार्जिनल रिलीफ नसल्यास, ६१,५०० रुपये (४ लाख रुपयांचा ५% + ४ लाख रुपयांचा १०% आणि १०,००० रुपयांचा १५%) इतका कर भरावा लागेल. पण, मार्जिनल रिलीफचा लाभ मिळाल्यामुळे (किरकोळ सवलतीमुळे), त्यांना प्रत्यक्षात १०,००० रुपये इतकाच कर भरावा लागणार आहे.
मार्जिनल रिलीफचा हिशेब खालील पद्धतीने केला जाते :
- सर्वप्रथम स्लॅब दरानुसार एकूण उत्पन्नावरील कर मोजला जातो.
- उदाहरणार्थ, १२,१०,००० रुपयांच्या एकूण उत्पन्नावरील कर खालील टप्प्यांमध्ये मोजला जाईल.
- मार्जिनल रिलीफशिवाय कर भरण्याची (या प्रकरणात ६१,५०० रुपये) तुलना एकूण उत्पन्नापेक्षा जास्त रकमेशी केली जाईल ज्यावर सवलत उपलब्ध आहे. [या प्रकरणात १०,००० रुपये, (म्हणजे १२,१०,००० रुपये). १२,००,००० रुपये]
- त्यामुळे या प्रकरणात निश्चित केलेल्या एकूण कर दायित्वामधून (म्हणजे ६१,५०० रुपये) १२, १०,००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न वजा करून मार्जिनल रिलीफची गणना केली जाईल.
- म्हणून, या प्रकरणात किरकोळ सवलतीच्या माध्यमातून ५१,५०० रुपये सूट (६१,५००- १०,०००= ५१,५००/-) उपलब्ध आहे.
- म्हणून देय कर १०,००० रुपये आहे [६१,५००-५१,५०० रुपये]
मार्जिनल रिलीफची उदाहरणे :
मार्जिनल रिलीफमुळे १२,५०,००० रुपयांच्या उत्पन्नाचे, कर दायीत्व ६७,५०० रुपयांवरून ५०,००० रुपयांपर्यंत कमी होते.
१२,७०,००० रुपयांच्या उत्पन्नावर सवलतीसह कर दायीत्व ७०,५०० रुपयांवरून ७०,००० रुपयांपर्यंत कमी होते.
एखाद्याचे उत्पन्न १२,७५,००० रुपये असल्यास त्याला मार्जिनल रिलीफ लागू होत नाही, त्यामुळे त्याला ७१,२५० रुपये इतका कर भरावा लागेल.
उत्पन्न | मार्जिनल रिलीफशिवाय भरायचा कर | मार्जिनल रिलीफ लागू असल्यास भरायचा कर |
१२,१०,००० रुपये | ६१,५०० रुपये | १०,००० रुपये |
१२,५०,००० रुपये | ६७,५०० रुपये | ५०,००० रुपये |
रु. १२,७०,००० रुपये | ७०,५०० रुपये | ७०,००० रुपये |
रु. १२,७५,००० रुपये | ७१,२५० रुपये | ७१,२५० रुपये (मार्जिनल रिलीफ लागू नाही) |
नवीन आयकर व्यवस्थेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ चे आयकर स्लॅब
एकूण उत्पन्न (रु.) | कलम ११५ बीएसी (१अ) अंतर्गत कर दर |
०-४ लाख | ०% |
४-८ लाख | ५% |
८-१२ लाख | १०% |
१२-१६ लाख | १५% |
१६-२० लाख | २०% |
२०-२४ लाख | २५% |
२४ लाखांहून अधिक | ३०% |