मुंबई: देशांतर्गत पातळीवर निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो आणि मारुतीच्या समभागात झालेल्या जोरदार समभाग खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांना नवीन अत्युच्च बंद पातळी शुक्रवारी नोंदवता आली. सलग चौथ्या सत्रात माफक प्रमाणात का होईना पण वाढ निर्देशांकांनी सप्ताहअखेरच्या सत्रात नोदविली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी २०.९६ अंशांनी वधारून ६२,२९३.६४ या नवीन उच्चांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने १७५.०५ अंशांची भर घालत ६२,४४७.७३ अंशांच्या या सार्वकालिक शिखर पातळीला स्पर्श केला. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील २८.६५ अंशांची भर घालत १८,५१२.७५ ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सत्रादरम्यान दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वधारले होते.
सलग चौथ्या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी २ टक्क्यांहून अधिक कमाई केली. सेन्सेक्सने सलग चार सत्रात १,१९० अंश तर निफ्टीने ३५२ अंशाची कमाई केली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू झालेली समभाग खरेदी, खनिज तेलाच्या किमतीतील घसरण, घसरलेला डॉलर निर्देशांक आणि रोख्यांवरील घटता परतावा दर यांसारख्या अनुकूल घटनांमुळे विक्रमी उच्चांकांजवळ पोहोचलेल्या निर्देशांकांसह भांडवली बाजारावर तेजीवाल्यांनी कब्जा केला आहे. अमेरिकी फेडरल रिझव्र्हने व्याजदरासंबधी घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
‘सेन्सेक्स’ची तेजी जगात अद्वितीय
नवीन उच्चांक गाठताना, ‘सेन्सेक्स’ने अनोख्या विक्रमाचीही नोंद केली आहे. अत्युच्च शिखरापर्यंतच्या प्रवासात, गत वर्षभरात ‘सेन्सेक्स’चा सात टक्क्यांचा परतावा हा जगातील एक लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक बाजार भांडवल असलेल्या देशांमधील मोठय़ा बाजारांच्या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ने नमूद केले आहे. शिवाय ‘सेन्सेक्स’ने सलग सातव्या वर्षांत (कॅलेंडर वर्ष) सकारात्मक वार्षिक परतावा देणारी कामगिरी केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा आणि अन्न संकट, वाढती महागाई आणि व्याजदर वाढीचे चक्र, चलनाचे अवमूल्यन आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली लक्षणीय माघार अशा प्रतिकूलतेचा परिणाम जगभरातील सर्वच भांडवली बाजारांवर झाला आहे. अशा स्थितीत ‘सेन्सेक्स’ची कामगिरी अद्वितीय ठरली आहे.