पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात ११३ टक्क्यांची वाढ नोंदवत तो मागील १२ वर्षांतील उच्चांकाला म्हणजे १२,३८३.६४ कोटींवर गेल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी याच महिन्यात यापोटी ५,८१०.१० कोटी रुपये एलआयसीने मिळवले होते. सामान्य लोकांमध्ये विम्याविषयी जागरूकता आणि आस्था वाढल्याने विमा कंपन्यांच्या व्यवसायात महिनागणिक वाढ होत आहे. आयुर्विमा कंपन्यांना पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात सरलेल्या एप्रिल महिन्यात तब्बल ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

वर्ष २०१४ नंतर प्रथमच एलआयसीचे उत्पन्न उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. कंपनीचे नावीन्यपूर्ण विपणन धोरण आणि त्याची अंमलबजावणी आणि विश्वासार्हता आणि ग्राहक-केंद्रित सेवा अधिक मजबूत केल्याने ही कामगिरी साध्य केल्याचे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 10 May 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना धक्का! सोनं-चांदी महागलं, १० ग्रॅमचा भाव आता…

वैयक्तिक हप्ता श्रेणी अंतर्गत, एलआयसीने एप्रिल २०२४ मध्ये एकूण ३,१७५.४७ कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला, जो एप्रिल २०२३ मध्ये गोळा केलेल्या २,५३७.०२ कोटी रुपयांच्या तुलनेत २५.१७ टक्के आधी राहिला आहे. तर समूह हप्ता श्रेणी अंतर्गत एप्रिल २०२३ मधील ३,२३९.७२ कोटींवरून एप्रिल २०२४ मध्ये ते १८२.१६ टक्क्यांनी वाढून ९,१४१.३४ कोटी रुपये झाले.

एलआयसीने विक्री केलेल्या पॉलिसी आणि योजनांची एकूण संख्या एप्रिल २०२३ मध्ये ७.८५ लाख होती. ती एप्रिल २०२४ अखेर ९.१२ टक्क्यांनी वाढून ८.५६ लाखांवर पोहोचली आहे.

खासगी कंपन्यांची कामगिरी कशी?

विमा उद्योगातील खासगी कंपन्यांमध्ये, एसबीआय लाइफने पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात २६ टक्के वाढ नोंदवली आहे. तर एचडीएफसी लाइफच्या उत्पन्नात ४.३१ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या उत्पन्नात २८.१३ टक्के, बजाज अलियान्झ लाइफ २५.२० टक्के तर मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे उत्पन्न ४१ टक्क्यांनी वाढले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic first installment income from new customers hits 12 year high with rs 12383 crore in april up 113 percent amy