वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोपांमुळे समभाग मूल्यातील पडझडीने अडचणीत आलेल्या अदानी समूहावर, सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने मात्र विश्वास दाखवत या काळात प्रत्यक्षात गुंतवणूक वाढवली आहे. ‘एलआयसी’ने सरलेल्या मार्च तिमाहीत अदानी एंटरप्रायझेससह, अदानी समूहातील इतर तीन कंपन्यांमधील गुंतवणुकीत मोठी भर घातली आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झालेल्या ‘हिंडेनबर्ग’ अहवालानंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले. परिणामी, अदानी समूहातील गुंतवणूकदारांचे एकूण गुंतवणूक मूल्यदेखील लक्षणीयरीत्या घटले आणि एलआयसीच्या गुंतवणुकीलाही याचा जबर तडाखा बसला. तरी सरलेल्या मार्च तिमाहीत एलआयसीने अदानी एंटरप्रायझेसच्या ३,५७,५०० समभागांची नव्याने खरेदी केली, असे भांडवली बाजाराकडून उपलब्ध आकडेवारी सांगते. यातून अदानी एंटरप्रायझेसमधील ‘एलआयसी’ची हिस्सेदारी डिसेंबरच्या तिमाहीत असलेल्या ४.२३ टक्क्यांवरून, मार्च २०२३ अखेरीस ४.२६ टक्क्यांवर पोहोचली आहे.
याचबरोबर एलआयसीने सरलेल्या तिमाहीत अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसमधील हिस्सेदारीही वाढवली आहे. तर दुसरीकडे, अदानी पोर्ट्स, एसीसी आणि अंबुजा या दोन सिमेंट कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये एलआयसीच्या समभागात मोठ्या प्रमाणावर घसरण झल्यानंतर एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीबाबत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. अदानी समूहाला वाचवण्यासाठी त्यामध्ये स्टेट बँक आणि ‘एलआयसी’ला गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले, असे आरोप करण्यात आले होते. मात्र एलआयसी दीर्घकालीन दृष्टिकोन आणि भांडवली बाजाराचा अभ्यास करूनच गुंतवणूक करते. तसेच ‘एलआयसी’चे अदानी समूहातील गुंतवणूक मूल्य एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. असे ‘एलआयसी’कडून स्पष्ट करण्यात आले होते.
- कंपनी हिस्सेदारी (३१ मार्च २०२३) (३१ डिसेंबर २०२२)
- अदानी एंटरप्रायझेस ४.२५% ४.२३% ( ०.०२%)
- अदानी ट्रान्समिशन ३.६८% ३.६५% ( ०.०३% )
- अदानी ग्रीन १.३५% १.२८% ( ०.०७%)
- अदानी टोटल गॅस ६.०२% ५.९६% ( ०.०६%)
- अदानी पोर्ट्स ९.१२% ९.१४% (-०.०२%)
- अंबुजा ६.२९% ६.३३% (-०.०४%)
- एसीसी ५.१३ % ६.४१% (-१.३१%)